Quick Recipe for Dosa:झटपट डोसा बनवण्याची सोपी कृती

सकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी झटपट आणि चविष्ट बनवायचं असेल तर तांदळाच्या पिठाचा डोसा एक उत्तम पर्याय आहे. हा डोसा बनवण्यासाठी तुम्हाला खूप कमी साहित्याची आवश्यक
सकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी झटपट आणि चविष्ट बनवायचं असेल तर तांदळाच्या पिठाचा डोसा एक उत्तम पर्याय आहे. हा डोसा बनवण्यासाठी तुम्हाला खूप कमी साहित्याची आवश्यकता लागेल. पारंपरिक पद्धतीने डोसा बनवताना तुम्हाला डाळ आणि तांदूळ भिजवून, त्यांना दळून, अनेक प्रक्रियांचा सामना करावा लागतो, ज्यामुळे वेळ लागतो. मात्र, या इंस्टंट रेसिपीत तुम्ही कमी वेळात आणि कमी साहित्यात कुरकुरीत आणि खमंग डोसा तयार करू शकता. चला तर मग, तांदळाच्या पिठाचा डोसा कसा बनवायचा हे पाहूया.
डोसा बनवण्यासाठी सर्वप्रथम १ कप तांदळाचं पीठ घ्या. त्यात १ चमचा बेसन आणि १ चमचा रवा घाला. या सर्व घटकांना एकत्र करून चमच्याच्या साहाय्याने एकसारखे फेटा. त्यानंतर यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, गाजर, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घाला. चवीनुसार मीठ आणि १ छोटा चमचा जीरं देखील घाला. आता या मिश्रणात ४ कप पाणी घालून डोश्याच्या पिठासमान पातळ मिश्रण तयार करा. हे मिश्रण झाकून १० मिनिटांसाठी ठेवा, ज्यामुळे सर्व घटक चांगले एकत्र होतील.
तवा गरम झाल्यावर त्यावर थोडं तेल लावून घ्या. आता चमच्याच्या साहाय्याने डोश्याचं पीठ तव्यावर ओता. डोसा कडेकडून आणि मध्यभागी ओता, आणि कॉर्नरला तेल लावायला विसरू नका. ३ ते ४ मिनिटांत डोसा व्यवस्थित शिजेल. त्यानंतर चमच्याच्या साहाय्याने डोसा उलटा करून दुसऱ्या बाजूनेही शिजवा. तुम्हाला चिझ डोसा आवडत असेल तर डोशावर चिझ घालून दोन्ही बाजूंनी शिजवून घ्या. हा डोसा नारळाच्या चटणी, टोमॅटो चटणी किंवा बटाट्याच्या भाजीसोबत खाण्यासाठी उत्तम आहे. मुलांना शाळेत डब्यात द्यायला किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी हा डोसा एक उत्तम पर्याय आहे.



















