Naxalism Declines:स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतर नक्षलवाद्यांचा माज उतरला

छत्तीसगडमधील बस्तर भागातील ९२ गावांमध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच १५ ऑगस्ट रोजी तिरंगा ध्वज फडकावला जाणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नक्षलवाद्यांच
छत्तीसगडमधील बस्तर भागातील ९२ गावांमध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच १५ ऑगस्ट रोजी तिरंगा ध्वज फडकावला जाणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नक्षलवाद्यांच्या दहशतीखाली असलेल्या या भागात, पूर्वी १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला नक्षलवादी काळे आणि लाल झेंडे फडकवून लोकांना भितीच्या छायेत ठेवत होते. मात्र, आता या गावांमध्ये भारताचा तिरंगा ध्वज गर्वाने फडकणार आहे, हे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी जाहीर केले आहे. ३१ मार्च रोजी सशस्त्र नक्षलवाद्यांचा बीमोड केल्यानंतर हा पहिलाच राष्ट्रीय उत्सव आहे. या ९२ गावांमध्ये बीजापूर जिल्ह्यातील ३३, सुकमा जिल्ह्यातील ५० आणि नारायणपूर जिल्ह्यातील ९ गावांचा समावेश आहे. या ऐतिहासिक क्षणामुळे स्थानिक नागरिकांमध्ये आनंद आणि उत्साहाचे वातावरण आहे.
उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी सांगितले की, दुर्गम भागांतील गावे तिरंगा यात्रेने जोडली जातील. नक्षली हिंसाचारामुळे 'कुख्यात' झालेले हे भाग आता विकासाच्या प्रवाहात सामील होत आहेत. बस्तरच्या प्रत्येक गावात तिरंगा यात्रा काढली जाईल, ज्यामध्ये सिलगेर, टेकालगुडम, रानीबोदली आणि दरभा सारखी दुर्गम गावे समाविष्ट आहेत. भारतीय जनता युवा मोर्चा आणि स्थानिक तरुण या मोटरसायकल रॅलीत सहभागी होऊन देशभक्तीचा संदेश देतील. या उपक्रमामुळे स्थानिक तरुणांमध्ये एकजुटीचा आणि देशभक्तीचा भाव जागृत होईल, हे निश्चित आहे.


















