Health Concerns for Iran's Leader:इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांची प्रकृती गंभीर

इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांच्या आरोग्याची स्थिती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या प्रकृतीवर चर्चा सुरू झाल्यानंतर इराणच्या राज
इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांच्या आरोग्याची स्थिती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या प्रकृतीवर चर्चा सुरू झाल्यानंतर इराणच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. मोजतबा खामेनी यांचे वडील अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू अमेरिकन आणि इस्रायली हल्ल्यात झाला होता, त्यानंतर मोजतबा यांनी देशाची धुरा सांभाळली होती. परंतु आता त्यांच्या आरोग्याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. जर ते सर्वोच्च नेत्याचे पद सांभाळण्यास असमर्थ ठरले किंवा त्यांचा मृत्यू झाला, तर इराणचे नेतृत्व कोणाकडे जाणार, हा प्रश्न आता इराण आणि जागतिक राजकारणाचे लक्ष वेधून घेत आहे.
इस्रायलच्या चॅनेल १४ ने दिलेल्या माहितीनुसार, मोजतबा खामेनी यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. इतर आंतरराष्ट्रीय अहवालांमध्येही त्यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. तथापि, इराणच्या अधिकृत यंत्रणांनी किंवा कोणत्याही स्वतंत्र स्रोताने या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. सर्वोच्च नेतेपद स्वीकारल्यानंतर मोजतबा खामेनी सार्वजनिक ठिकाणी प्रत्यक्ष समोर आलेले नाहीत, ज्यामुळे त्यांच्या आरोग्याबाबतच्या संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
इराणच्या संविधानानुसार, सर्वोच्च नेत्याचे पद रिकामे झाल्यास नव्या नेत्याची निवड होईपर्यंत विशेष व्यवस्था केली जाते. संविधानातील कलम १११ नुसार, सर्वोच्च नेत्याचा मृत्यू झाल्यास किंवा त्यांनी राजीनामा दिल्यास किंवा ते कारभार पाहण्यास असमर्थ ठरल्यास तीन सदस्यांची तात्पुरती परिषद देशाचा कारभार हाती घेते. या परिषदेमध्ये इराणचे विद्यमान अध्यक्ष मसूद पेझेश्कियान, न्यायपालिकेचे प्रमुख गुलाम हुसेन मोहसेनी आणि गार्डियन कौन्सिलचे एक धार्मिक कायदेतज्ज्ञ यांचा समावेश होऊ शकतो. सर्वोच्च नेत्याची औपचारिक निवड करण्याची घटनात्मक जबाबदारी ८८ सदस्यांच्या असेंबली ऑफ एक्सपर्ट्स या संस्थेकडे असते. सर्वोच्च नेत्याकडे इराणचे सैन्य, न्यायव्यवस्था, परराष्ट्र धोरण आणि इतर सर्व प्रमुख सरकारी संस्थांचे सर्वाधिकार असतात. त्यामुळे हे पद रिकामे झाल्यास लवकरात लवकर नवीन नेत्याची निवड करणे या असेंबलीसाठी बंधनकारक असते. सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत मोजतबा खामेनी यांच्या अनुपस्थितीमुळे इराणच्या राजकीय भविष्याबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध शक्यता वर्तवल्या जात आहेत.


















