Toll Criteria Under Scrutiny:कोकणवासीयांच्या खिशाला दुहेरी कात्री

अलिबाग – मुंबई-गोवा महामार्गाच्या कामात अद्याप प्रगती झालेली नाही, तरीही खारपाडा येथील टोलनाका सुरू करण्यात आलेला आहे. आता सुकेळी खिंडीतील टोलनाक्याचे उद्घाटन क
अलिबाग – मुंबई-गोवा महामार्गाच्या कामात अद्याप प्रगती झालेली नाही, तरीही खारपाडा येथील टोलनाका सुरू करण्यात आलेला आहे. आता सुकेळी खिंडीतील टोलनाक्याचे उद्घाटन करण्याची प्रक्रिया अंतिम टप्यात आहे. याच दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग विभागाने टोलनाके उभारताना अंतराच्या निकषांचे पालन न केल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे कोकणातील नागरिकांच्या आर्थिक परिस्थितीवर गंभीर परिणाम होणार असल्याची चिंता रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे व्यक्त केली आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणाऱ्या लाखो कोकणवासीयांच्या खिशावर दुहेरी टोलचा भार येणार आहे. पळस्पे-इंदापूर मार्गावर अवघ्या चाळीस किलोमीटरच्या अंतरात खारपाडा आणि सुकेळी असे दोन टोल नाके उभारण्यात आले आहेत, ज्यामुळे प्रवाशांना एकाच प्रवासात दोनदा टोल भरावा लागणार आहे. मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरातून दररोज हजारो नागरिक रोजगार, व्यवसाय, शिक्षण आणि इतर कामांसाठी कोकणात ये-जा करतात. गणेशोत्सव, उन्हाळी सुट्ट्या आणि पर्यटन हंगामात या मार्गावर वाहनांची वर्दळ वाढते. अशा परिस्थितीत अवघ्या चाळीस किलोमीटरच्या अंतरात दोनदा टोल आकारणे म्हणजे प्रवाशांच्या खिशावर अन्यायकारक आर्थिक बोजा टाकणे, असे वाहनचालकांचे मत आहे.





















