Mild Earthquake in Nashik: नाशिक जिल्हा भूकंपाच्या सौम्य धक्क्यांनी हादरला

नाशिक जिल्ह्यात शनिवारी रात्री १० वाजून १ मिनिटाला भूकंपाचा सौम्य झटका जाणवला. हा झटका दिंडोरी, त्र्यंबकेश्वर आणि पेठ या तालुक्यांमध्ये विविध गावांमध्ये अनुभवला
नाशिक जिल्ह्यात शनिवारी रात्री १० वाजून १ मिनिटाला भूकंपाचा सौम्य झटका जाणवला. हा झटका दिंडोरी, त्र्यंबकेश्वर आणि पेठ या तालुक्यांमध्ये विविध गावांमध्ये अनुभवला गेला. भूकंपाच्या या धक्क्यांचा अनुभव नागरिकांना सुमारे २०-२२ सेकंदांपर्यंत झाला. काही ठिकाणी जोरदार आवाजही ऐकू आला. गेल्या पंधरवड्यात भूकंपाचे अनेक सौम्य धक्के जिल्ह्यात जाणवले आहेत, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शास्त्रीयदृष्ट्या हे धक्के सौम्य तीव्रतेचे असल्याचे सांगण्यात आले आहे, तरीही नागरिकांनी सावध राहणे आवश्यक आहे.
दिंडोरी तालुक्यातील भनवड-शिंदपाडा या ठिकाणी भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. येथे ३.८ रिश्टर स्केल इतकी तीव्रता नोंदवली गेली. प्रशासनाने नागरिकांना घाबरून जाऊ नये, अफवा पसरवू नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नये असे स्पष्ट केले आहे. भूकंपाच्या या धक्क्यांवर प्रशासनाकडून लक्ष ठेवले जात आहे. शनिवारी झालेल्या धक्क्याची उथळ खोली केवळ ३.२ किमी होती, ज्यामुळे जमिनीवर कंपण अधिक तीव्रतेने जाणवले. यापूर्वी, भूकंपाचे धक्के साधारणतः ५ किमी खोलीवर जाणवत होते, परंतु शनिवारी खोली कमी झाल्यामुळे धक्का अधिक तीव्र अनुभवला गेला.





















