Building Collapse in Nalasopara: नालासोपाऱ्यात इमारतीचा सज्जा कोसळला; जीवितहानी टळली, ५६ कुटुंबांचे तातडीने स्थलांतर

नालासोपारा पूर्वेकडील संकेश्वर नगर परिसरात शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ‘रोशनी अपार्टमेंट’ या चार मजली इमारतीचा सज्जा अचानक कोसळल्याने परिसरात मोठा गों
नालासोपारा पूर्वेकडील संकेश्वर नगर परिसरात शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ‘रोशनी अपार्टमेंट’ या चार मजली इमारतीचा सज्जा अचानक कोसळल्याने परिसरात मोठा गोंधळ उडाला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, पालिका प्रशासनाने तातडीने इमारतीतील ५६ कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवले. घटनेच्या वेळी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून सज्जा कोसळत असल्याने रहिवाशांमध्ये एकच धावपळ झाली. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जखमी झालेली नाही. इमारतीच्या सज्जा कोसळण्याच्या घटनेची माहिती मिळताच वसई-विरार महापालिकेच्या अग्निशामक दलाने आणि स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी इमारतीतील सर्व रहिवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले आणि परिसर सील केला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
‘रोशनी अपार्टमेंट’ ही इमारत सुमारे १० ते १५ वर्षे जुनी आहे. या इमारतीत ५६ सदनिका आणि ३ गाळे आहेत. मात्र, अवघ्या काही वर्षांतच इमारतीची अवस्था अत्यंत जीर्ण झाली आहे. स्थानिक रहिवाशांनी कंत्राटदाराच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, या घटनेमुळे त्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन इमारतीच्या रचनात्मक तपासणीसाठी पावले उचलली आहेत. या तपासणीच्या अहवालानंतर इमारतीच्या भविष्यातील निर्णयाबाबत विचार केला जाईल.




















