Water Crisis in Rainy Season:पावसाळ्यात पाण्याचा तुटवडा

पनवेल शहरात पावसाळ्यात पाण्याची उपलब्धता वाढेल, अशी अपेक्षा असताना कळंबोली आणि रोडपाली उपनगरांतील नागरिकांना गेल्या दहा दिवसांपासून तीव्र पाणीटंचाईचा सामना कराव
पनवेल शहरात पावसाळ्यात पाण्याची उपलब्धता वाढेल, अशी अपेक्षा असताना कळंबोली आणि रोडपाली उपनगरांतील नागरिकांना गेल्या दहा दिवसांपासून तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. कळंबोलीला रोज ३० दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असताना, त्यापैकी फक्त २० ते ११ एमएलडी पाणीच उपलब्ध होत आहे. त्यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. रोडपालीच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचत नसल्याने रहिवाशांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. या प्रभागाचे नेतृत्व उपमहापौर प्रमिला पाटील करीत असतानाही पाण्याचा प्रश्न सुटत नसल्याने नागरिकांमध्ये संताप आहे. रोडपाली भागाला सर्वाधिक कमी पाणी मिळत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. २६ जुलै रोजी स्थानिक नगरसेवकांची बैठक घेऊन पाणीपुरवठ्याबाबत चर्चा करण्यात आली. नगरसेवकांनी महापालिकेकडे पाणीपुरवठा सेवा अद्याप हस्तांतरित झालेली नसल्याचे सांगितले. महापालिकेने मालमत्ता कर वसुलीसाठी आग्रही असतानाही पाणीपुरवठ्यासारख्या मूलभूत सुविधांची जबाबदारी झटकली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. कळंबोलीसह सिडकोच्या उपनगरांना सिडको मंडळाकडून पाणीपुरवठा केला जातो. पनवेल महापालिकेचे स्वतःचे धरण नसल्यामुळे पाणीपुरवठा अद्याप महापालिकेकडे हस्तांतरित झालेला नाही. सिडकोचा पाणीपुरवठा विभाग महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर अवलंबून आहे. मागील दहा दिवसांपासून कळंबोलीला निम्म्याहून कमी पाणी मिळत असल्याने रोडपालीतील परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. पाणीपुरवठ्याची वेळ अत्यल्प असल्याने अनेक रहिवाशांना पाणी साठवण्यासाठी धावपळ करावी लागते. कोट्यवधी रुपये खर्च करून सदनिका घेतलेल्या नागरिकांना आता नियमित पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे पावसाळ्यातही कळंबोली आणि रोडपालीतील पाणीप्रश्नाने नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत.
रोडपालीतील नागरिकांनी सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधून पाणीटंचाईकडे लक्ष वेधले. सिडकोच्या सहाय्यक कार्यकारी अभियंत्यांनी ७ ऑगस्ट रोजी दिलेल्या लेखी उत्तरात एमजेपीकडून सिडकोला होणाऱ्या पाणीपुरवठ्याची आकडेवारी दिली आहे. मे आणि जून महिन्यात दररोज सरासरी २२.०७ एमएलडी, जुलैमध्ये १९.२० एमएलडी, तर ऑगस्टमध्ये आतापर्यंत १६.७६ एमएलडी पाणी मिळाले आहे. कळंबोलीला गेल्या सात दिवसांत झालेल्या पाणीपुरवठ्याची आकडेवारी परिस्थितीचे गांभीर्य स्पष्ट करते. १ ऑगस्टला १८.९३ एमएलडी, २ ऑगस्टला २०.४० एमएलडी, ३ ऑगस्टला २०.६२ एमएलडी, ४ ऑगस्टला १६.८५ एमएलडी, ५ ऑगस्टला १३.२३ एमएलडी, ६ ऑगस्टला १५.९७ एमएलडी, तर ७ ऑगस्टला सर्वांत कमी म्हणजे ११.३८ एमएलडी पाणी एमजेपीकडून सिडकोला मिळाले. त्यामुळे कळंबोलीतील पाणीपुरवठा आणखी घटल्याचे सांगितले जात आहे. नागरिकांनी मतदान केलेल्या प्रतिनिधींना पाणीप्रश्नाबाबत समस्या मांडल्या आहेत. मात्र पनवेल महापालिकेने पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर जबाबदारी झटकणे योग्य नाही. काही तांत्रिक अडचणींमुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला असेल, तर त्यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. एवढे दिवस उलटूनही समस्या सुटत नसल्याने पावसाळ्यात खासगी टँकरने पाणी विकत घ्यावे लागते. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत महापालिका आणि सिडकोने नागरिकांना माफक दरात पाण्याचे टँकर उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी केली आहे.





















