Traffic Hazard in Bhayander:भाईंदरमधील वादग्रस्त उड्डाणपुलावर वाहतुकीला अडथळा

भाईंदर शहरात मिरा-भाईंदरच्या एमएमआरडीएने उभारलेल्या वादग्रस्त उड्डाणपुलावर आता मोकाट गुरांचा मुक्त संचार सुरू झाल्याचे दिसून आले आहे. या पुलावर गुरे वावरत असल्य
भाईंदर शहरात मिरा-भाईंदरच्या एमएमआरडीएने उभारलेल्या वादग्रस्त उड्डाणपुलावर आता मोकाट गुरांचा मुक्त संचार सुरू झाल्याचे दिसून आले आहे. या पुलावर गुरे वावरत असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे आणि त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. मेट्रो मार्गासमांतर उभारण्यात आलेला हा पूल काही दिवसांपूर्वी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. दीपक हॉस्पिटल ते रेल्वे फाटकादरम्यान असलेल्या या पुलाने आपल्या अनोख्या रचनेमुळे देशभरात चर्चेचा विषय बनला आहे. तथापि, या पुलावर काही ठिकाणी रस्ता अचानक निमुळता झाल्यामुळे वाहनचालकांना सावधगिरी बाळगावी लागते. यामुळेच मोकाट गुरांचा वावर सुरू झाल्याने अपघाताची शक्यता अधिक वाढली आहे.
गुरांच्या वावरामुळे पुलावर शेण पडत असल्याने विशेषतः दुचाकीस्वारांना घसरून अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या प्रकाराचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले आहेत, ज्यामुळे नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने मोकाट गुरांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने मुख्य मार्गांवर जनावरे आणणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिल्याची माहिती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
मिरा-भाईंदर शहरातील मोकाट जनावरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने एक कंत्राटदार नियुक्त केला आहे. या कंत्राटदारावर जनावरे मोकाट सोडणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच रस्त्यावर आढळणारी जनावरे ताब्यात घेऊन गौशाळेत पाठविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रशासनाकडून नियमित कारवाई होत असल्याचा दावा केला जात असला, तरी शहरातील विविध रस्त्यांवर अजूनही मोकाट जनावरे दिसून येत असल्याने ही मोहीम प्रभावी ठरत नसल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाने या समस्येवर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.



















