Land Dispute in Thane:ठाण्यातील एक हजार एकर जमीन वनविभागाचीच

मुंबई: ठाण्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या १ हजार ५३ एकर वन जमिनीवर खासगी विकासकांचा दावा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी फेटाळला आहे. महसूल न्यायाध
मुंबई: ठाण्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या १ हजार ५३ एकर वन जमिनीवर खासगी विकासकांचा दावा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी फेटाळला आहे. महसूल न्यायाधिकरण आणि कोकण विभागीय अप्पर आयुक्तांच्या आदेशांना रद्द करून, या जमिनीवर 'महाराष्ट्र शासन, राखीव वने' ही नोंद कायम ठेवण्याचा अंतिम आदेश त्यांनी दिला. या निर्णयामुळे ठाण्यातील बिल्डर लाॅबीला मोठा धक्का बसला आहे. या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर 'महाराष्ट्र शासन राखीव वने' आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची नोंद कायम ठेवली गेली आहे. या प्रकरणात वन विभागाने अर्ज न केल्याने, महसूलमंत्र्यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन निर्णय घेतला. या निर्णयामुळे ठाण्यातील वनक्षेत्र अबाधित राहणार आहे आणि सरकारचा वनजमीन खासगी व्यक्तींना देण्याचा उद्देश नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
महसूल न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीच्या आदेशानुसार, घोडबंदर मार्गावरील भाईंदरपाडा-ओवळे येथील १,०५३ एकर जमीन १९७५ पासून वन विभागाच्या ताब्यात आहे. या जमिनीवर खासगी खातेदारांचे नाव दाखल करणारी विवादित फेरफार नोंद २०१९ मध्ये अपर विभागीय आयुक्तांच्या निर्णयान्वये कायम झाली होती. तथापि, महसूल न्यायालयाच्या जुन्या आदेशामुळे ही जमीन खासगी खातेदारांकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला होता. याबाबत सखोल चौकशी करण्यात आली आणि जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर महसूल विभागाने पुनर्विलोकन अर्जावर सुनावणी घेतली. यानुसार, खासगी खातेदारांची नावे दाखल करणारी फेरफार नोंद रद्द करण्यात आली आहे, आणि जमिनीवर 'महाराष्ट्र शासन राखीव वने' आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची नोंद कायम ठेवण्यात आली आहे.



















