Special Trains for Ganesh Festival:गणेशोत्सवासाठी पश्चिम रेल्वेच्या ८ विशेष गाड्या

वसई: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असल्याने आणि अतिरिक्त गाड्या चालवण्याची मागणी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वे प्रशासनाने ८ वि
वसई: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असल्याने आणि अतिरिक्त गाड्या चालवण्याची मागणी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वे प्रशासनाने ८ विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई आणि गुजरातमधील विविध स्थानकांवरून या विशेष गाड्यांच्या ४२ फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. तिकीट आरक्षण प्रक्रिया ९ ऑगस्टपासून सुरू होणार आहे, ज्यामुळे प्रवाशांना गणेशोत्सवाच्या काळात सोयीस्कर प्रवासाची सुविधा मिळेल. यावर्षी गणेशोत्सव १४ सप्टेंबर रोजी साजरा केला जाणार आहे, आणि महाराष्ट्रभर हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मुंबई, ठाणे, पालघर आणि इतर ठिकाणांवर राहणारे कोकणवासी या सणानिमित्त कोकणात जातात. त्यामुळे जुलै महिन्यापासूनच तिकीटांचे आगाऊ आरक्षण सुरू होते. मात्र, प्रवाशांची वाढती गर्दी आणि मर्यादित गाड्या यामुळे तिकीट मिळवण्यात अनेकांना अडचणी येत होत्या. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडे अतिरिक्त गाड्या चालवण्याची मागणी जोर धरली होती.
मध्य रेल्वे प्रशासनाने २४६ विशेष गाड्यांची घोषणा केल्यानंतर, पश्चिम रेल्वेनेही ८ विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. या गाड्या ९ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध दिवशी धावणार आहेत. विशेष गाड्यांच्या माध्यमातून मुंबई आणि गुजरातमधून कोकणात ४२ फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. या गाड्यांमुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष गाड्या मुंबई व उपनगरातील महत्त्वाच्या स्थानकांवर थांबणार आहेत, ज्यात मुंबई सेंट्रल, बांद्रा टर्मिनस, बोरीवली, वसई रोड, भिवंडी रोड आणि पनवेल यांचा समावेश आहे. कोकण रेल्वे मार्गावर रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या प्रमुख स्थानकांवर प्रवाशांना चढता-उतरता येईल. याशिवाय, गुजरातमधून सुटणाऱ्या गाड्यांसाठी वडोदरा, सूरत, उधना, वलसाड, वापी आणि पालघर या स्थानकांवर थांबणार आहेत. या विशेष गाड्यांमुळे पश्चिम उपनगरीय प्रवाशांना सोयीस्कर पर्याय उपलब्ध झाला आहे.





















