Snake rumor causes train delays:सापाच्या अफवेमुळे रेल्वे सेवा विस्कळीत

मुंबई : मध्य रेल्वेच्या उपनगरी गाडीच्या महिला डब्यात साप असल्याच्या अफवेने शुक्रवारी सकाळी गर्दीच्या वेळी डोंबिवली-सीएसएमटी धीमी लोकल चार वेळा थांबविण्यात आली.
मुंबई : मध्य रेल्वेच्या उपनगरी गाडीच्या महिला डब्यात साप असल्याच्या अफवेने शुक्रवारी सकाळी गर्दीच्या वेळी डोंबिवली-सीएसएमटी धीमी लोकल चार वेळा थांबविण्यात आली. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली आणि ठाणे स्थानकात आपत्कालीन साखळी ओढली गेली. यामुळे लोकल १२ मिनिटे खोळंबली. नंतर मुलुंड, नाहूर आणि कुर्ला स्थानकांवरही लोकल थांबवून सापाची तपासणी करण्यात आली. मात्र, सर्पमित्रांनी केलेल्या तपासणीत साप आढळला नाही. या सर्व प्रकारामुळे अप धीम्या मार्गावरील सुमारे १५ ते २० लोकलचे वेळापत्रक विस्कळीत झाले. त्यामुळे हजारो प्रवाशांचा खोळंबा झाला आणि त्यांना त्यांच्या गंतव्यस्थानांपर्यंत पोहोचण्यासाठी अधिक वेळ लागला. सकाळी ८.४१ वाजता डोंबिवलीहून सीएसएमटीकडे निघालेली धीमी लोकल ठाणे स्थानकात ९.१४ वाजता पोहचली. यावेळी साप असल्याची अफवा पसरली आणि प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. त्यामुळे लोकल ठाण्यात ९.१४ ते ९.२६ या कालावधीत थांबली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी महिला डब्याची तपासणी केली, परंतु त्यांना साप आढळला नाही. लोकल नंतर पुढे रवाना झाली, पण प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण असल्याने मुलुंड येथे ९.३१ ते ९.३३ आणि नाहूर येथे ९.३६ ते ९.४० या वेळेत पुन्हा थांबवून पाहणी करण्यात आली. सकाळी १०.०७ वाजता लोकल कुर्ला स्थानकात आणण्यात आली. येथे महिला डब्यातील सर्व प्रवाशांना खाली उतरवून सर्पमित्रांना पाचारण करण्यात आले. त्यांनी डब्याच्या सर्व भागांची तपासणी केली, पण साप आढळला नाही. तपासणीनंतर रेल्वे प्रशासनाने महिला प्रवाशांना दुसऱ्या डब्यातून प्रवास करण्याचे आवाहन केले. काही महिलांनी मात्र त्याच डब्यातून प्रवास करण्याचा आग्रह धरला. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने दोन महिला आरपीएफ जवानांची त्या डब्यात नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर लोकल सीएसएमटीच्या दिशेने रवाना करण्यात आली. या संपूर्ण प्रकारामुळे मागून येणाऱ्या लोकलवर परिणाम झाला. सकाळी गर्दीच्या वेळी ठाणे, मुलुंड, नाहूर आणि इतर स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली. अनेकांना नियोजित लोकल सोडून पुढील लोकलची प्रतीक्षा करावी लागली. परिणामी, अप धीम्या मार्गावरील सुमारे २० लोकल विलंबाने धावल्या आणि अनेक नोकरदारांना कार्यालयात पोहोचण्यासाठी उशीर झाला.





















