Railway Route Change: पुणे-नाशिक रेल्वे मार्गात बदलामुळे विकासाला अडथळा

मंचर : खेड, आंबेगाव आणि जुन्नर या परिसराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी पुणे-नाशिक रेल्वे मूळ नियोजित सरळ मार्गानेच असावी, अशी ठाम भूमिका माजी खासदार शिवाजीराव आ
मंचर : खेड, आंबेगाव आणि जुन्नर या परिसराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी पुणे-नाशिक रेल्वे मूळ नियोजित सरळ मार्गानेच असावी, अशी ठाम भूमिका माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी ९ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनाला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. तथापि, पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे बाहेरगावी जावे लागल्याने आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होऊ शकणार नाही, असे त्यांनी सांगितले. आढळराव पाटील यांनी सांगितले की, खासदार असताना त्यांनी पुणे-नाशिक रेल्वेची संकल्पना मांडली होती. १२ वर्षांच्या प्रयत्नांनंतर, २०१६ मध्ये तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या प्रकल्पास २,४२५ कोटी रुपयांची मंजुरी दिली. त्यावेळी रेल्वेमार्ग चाकण–खेड–मंचर–नारायणगाव–आळेफाटा–संगमनेर–सिन्नर या मूळ मार्गाने प्रस्तावित होता. यानंतर हा प्रकल्प दुहेरी आणि देशातील पहिला सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला. रेल्वे बोर्डाच्या 'पिंक बुक'मध्येही या प्रकल्पाचा समावेश करण्यात आला. २०१९ पर्यंत या प्रकल्पाची किंमत वाढून १६,०३९ कोटी रुपयांवर पोहोचली होती. त्या वेळीही मूळ सरळ मार्गाला मंजुरी देण्यात आली होती, असे त्यांनी नमूद केले. परंतु, नंतरच्या काळात रेल्वेमार्गात बदल करून चाकण, खेड, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, संगमनेर आणि सिन्नर या महत्त्वाच्या भागांना वळसा घालण्यात आला. यामुळे या परिसराच्या औद्योगिक, व्यापारी आणि शैक्षणिक विकासाला मोठा फटका बसणार असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली.
आढळराव पाटील यांनी जीएमआरटी प्रकल्पामुळे रेल्वेमार्गास अडथळा निर्माण होतो, हा दावा तांत्रिकदृष्ट्या चुकीचा असल्याचे सांगितले. त्यांनी सरकारला देश-विदेशातील उपलब्ध माहितीच्या आधारे हे सिद्ध करून दाखवण्याचा विश्वास व्यक्त केला. पुणे-नाशिक रेल्वेचा प्रश्न हा कोणत्याही एका पक्षाचा नसून सर्वसामान्य जनतेच्या विकासाचा प्रश्न आहे, त्यामुळे राज्य आणि केंद्र शासनाने याची गंभीर दखल घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. आंदोलनात प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार नसले तरी पुणे-नाशिक रेल्वे पूर्वी निश्चित करण्यात आलेल्या पुणे-नाशिक महामार्गालगतच्या सरळ मार्गानेच व्हावी, यासाठी अंतिम यश मिळेपर्यंत सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.



















