Power Supply Issues in Sinnar:सिन्नर एमआयडीसीत वीज पुरवठ्याचे गंभीर प्रश्न

नाशिक – सिन्नर एमआयडीसी परिसरात महावितरणच्या वीज पुरवठ्यातील अनियमितता आणि अपुऱ्या पुरवठ्यामुळे उद्योजकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दिवसातून चार त
नाशिक – सिन्नर एमआयडीसी परिसरात महावितरणच्या वीज पुरवठ्यातील अनियमितता आणि अपुऱ्या पुरवठ्यामुळे उद्योजकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दिवसातून चार ते पाच वेळा वीज खंडित होत असल्याने उद्योगांचे कामकाज विस्कळीत झाले आहे. एकही दिवस अखंड वीज पुरवठा मिळत नसल्यामुळे उद्योजकांमध्ये असंतोष वाढत आहे. या समस्येवर तातडीने उपाययोजना न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा सिन्नर इंडस्ट्रियल अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (सीमा) दिला आहे. वीज भार मंजूर होण्यास अडचणी येत असल्यामुळे नवीन उद्योग सुरू करणे आणि विद्यमान उद्योगांचा विस्तार करणे कठीण झाले आहे. त्यामुळे या क्षेत्रात आर्थिक नुकसान होत आहे, ज्यामुळे उद्योजकांची चिंता वाढली आहे.
उद्योगांच्या उत्पादन प्रक्रियेत वारंवार वीज खंडित होणे हे एक गंभीर मुद्दा बनले आहे. अनेक उद्योगांना दररोज लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. यंत्रणा अचानक बंद पडल्याने कच्चा माल, तयार माल आणि यंत्रसामग्रीचे मोठे नुकसान होत आहे. महावितरण प्रशासनाकडून या समस्येकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचा आरोप उद्योजकांनी केला आहे. महावितरणने नवीन ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून दिला होता, परंतु त्याच्या कार्यान्वयनापूर्वी आवश्यक तांत्रिक चाचण्या न केल्यामुळे त्यात दोष आढळला. परिणामी, तो ट्रान्सफॉर्मर वापरात आणता आलेला नाही आणि तो परत पाठवावा लागला. या प्रकारामुळे महावितरणच्या कार्यपद्धतीवर उद्योजकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.





















