New Mumbai Development Plan: तिसऱ्या मुंबईचा आराखडा सिंगापूरच्या कंपनीकडून तयार होणार

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) अटल सेतूच्या पायथ्याशी तिसरी मुंबई वसविण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर काम सुरू करणार आहे. या प्रकल्पाच्या आ
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) अटल सेतूच्या पायथ्याशी तिसरी मुंबई वसविण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर काम सुरू करणार आहे. या प्रकल्पाच्या आराखड्याची जबाबदारी सिंगापूरच्या प्रसिद्ध कंपनी सुरबाना ज्युरोंग इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडवर सोपवण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुक्रवारी या संदर्भात करार करण्यात आला. या करारामुळे तिसऱ्या मुंबईच्या आराखड्याच्या तयारीला गती मिळणार आहे आणि ३० आठवड्यांच्या आत हा आराखडा पूर्ण करण्यात येणार आहे. अटल सेतूच्या बांधकामामुळे मुंबई आणि नवी मुंबई यांच्यातील प्रवास अधिक जलद झाला आहे, त्यामुळे या क्षेत्रात विकासाच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. तिसऱ्या मुंबईच्या विकासासाठी ३२३.४४ चौरस किलोमीटर क्षेत्रासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून एमएमआरडीएची नियुक्ती करण्यात आली आहे.
सुरबाना ज्युरोंग कंपनीने जागतिक स्तरावर अनेक महत्त्वाच्या शहरांचे आराखडे तयार केले आहेत, त्यामुळे या कंपनीच्या अनुभवाचा लाभ घेऊन तिसऱ्या मुंबईचा सविस्तर आराखडा तयार केला जाईल. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात कंपनीला ११.८९ कोटी रुपये आणि दुसऱ्या टप्प्यात २३.१२ कोटी रुपये दिले जाणार आहेत. आराखड्यात कोणत्या भागात कोणत्या स्वरूपाचा भूवापर होईल, विकासाची प्रमुख केंद्रे कुठे असतील आणि भविष्यात शहराचा विस्तार कसा होईल याबाबत सखोल अभ्यास केला जाईल. याशिवाय, प्रादेशिक व शहरांतर्गत वाहतूक व्यवस्था, सार्वजनिक वाहतूक प्रणाली, विविध वाहतूक साधनांमधील समन्वय याबाबतही नियोजन केले जाईल.



















