Road Conditions in Navi Mumbai:नवी मुंबईतील रस्त्यांची दुरवस्था

नवी मुंबईतील अंतर्गत रस्त्यांची अवस्था यंदाच्या पावसाळ्यात पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. नियोजित शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईतील विविध नोडमधील रस्
नवी मुंबईतील अंतर्गत रस्त्यांची अवस्था यंदाच्या पावसाळ्यात पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. नियोजित शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईतील विविध नोडमधील रस्त्यांवर खड्डे, उखडलेले डांबरीकरण आणि पाण्याच्या साच्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांचा प्रवास धोकादायक बनला आहे. मुख्य रस्त्यांवरील दुरुस्तीच्या कामांना वेग येत असला तरी अंतर्गत रस्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. सिवूड्स सेक्टर ४६, ४८ आणि ५० या भागातील अंतर्गत रस्त्यांवर डांबरीकरण उखडल्याने वाहनचालकांना खड्डे चुकवत जावे लागत आहे. पावसाचे पाणी साचल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे दुचाकीस्वारांना मोठा धोका निर्माण झाला आहे. नियमित प्रवास करणाऱ्या काही वाहनचालकांनी सततच्या धक्क्यांमुळे पाठदुखी आणि मणक्याच्या त्रासात वाढ झाल्याची तक्रार केली आहे. घणसोली, कोपरखैरणे, तुर्भे, सानपाडा, वाशी आणि रबाळे परिसरातील अंतर्गत रस्त्यांचीही दुरवस्था झाली आहे. निवासी वसाहती, रेल्वे स्थानके, शाळा-महाविद्यालये आणि बाजारपेठांना जोडणाऱ्या रस्त्यांवर खड्डे पडल्याने वाहतुकीचा वेग कमी झाला आहे. सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी वाहनांच्या रांगा लागल्याने नागरिकांना कोंडीचा सामना करावा लागत आहे.
ऐरोली-मुलुंड टोलनाका ते दिवा गाव चौक या मार्गावरील खड्ड्यांबाबत नागरिक वारंवार तीव्र नाराजी व्यक्त करतात. या मार्गावरील देखभालीची जबाबदारी विविध यंत्रणांमध्ये विभागली गेल्याने दुरुस्तीला विलंब होत असल्याची टीका वारंवार होते. सध्या या भागात ऐरोलीहून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापर्यंत येणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. तसेच अनेक ठिकाणी पॅचवर्क करण्यात आल्याने वाहनचालकांना त्याचा त्रास होत आहे. ठाणे-बेलापूर मार्ग आणि शीव-पनवेल महामार्गावरील काही भागांतही पावसानंतर रस्त्यांची अवस्था बिघडल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या काही मार्गांच्या गुणवत्तेबाबतही नागरिकांनी समाजमाध्यमातून नाराजी व्यक्त केली आहे. नव्याने तयार झालेल्या काही रस्त्यांवर खडी सैल झाल्याने विशेषतः दुचाकीस्वारांसाठी धोका निर्माण झाल्याचे निदर्शनास आले आहे.



















