Metro Project Changes Possible:अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोच्या आराखड्यात बदलाची शक्यता

ठाणे शहरातील अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पाच्या मार्गात बदलाची शक्यता निर्माण झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महामेट्रो प्राधिकरणाला याबाबत आवश्यक
ठाणे शहरातील अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पाच्या मार्गात बदलाची शक्यता निर्माण झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महामेट्रो प्राधिकरणाला याबाबत आवश्यक सूचना दिल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून ठाण्यातील काही नागरिकांनी या प्रकल्पाच्या प्रस्तावित मार्गाला तीव्र विरोध दर्शविला आहे. या प्रकल्पामुळे लोकमान्य नगर व उपवन परिसरातील नागरिकांचे विस्थापन होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे अनेक सामाजिक संघटनांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट, लोकमान्य नगर, उपवन, वसंत विहार, घोडबंदर मार्ग, साकेत रोड, ठाणे रेल्वे स्थानक आणि प्रस्तावित नवे ठाणे रेल्वे स्थानक यासारख्या विविध भागांतून या मेट्रो मार्गाचा प्रस्ताव आहे. नागरिकांच्या हिताचा विचार न करता हा प्रकल्प राबवला जात असल्याचा आरोप अनेक संघटनांनी केला आहे. घोडबंदर व वसंत विहार भागातील काही गृहसंकुलांमधील रहिवाशांनीही या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शविला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनजागृती करण्याचा निर्णय घेतला असून, याबाबतच्या बैठकीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रकल्पाच्या मूळ आराखड्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. वागळे इस्टेट येथून लोकमान्य नगर बस आगारामार्गे उपवन परिसरात जाणाऱ्या प्रस्तावित मार्गामुळे सुमारे १,५०० कुटुंबे प्रभावित होण्याची शक्यता आहे. याशिवाय उपवन येथील काही लघुउद्योजकांचे कारखानेही या प्रकल्पामुळे प्रभावित होऊ शकतात. वीर सावरकर नगर, महात्मा फुले नगर, रुणवाल प्लाझा परिसर, लोकमान्य नगर पाडा क्रमांक १ व २, वेदांत कॉम्प्लेक्स, दोस्ती कॉम्प्लेक्स, समता नगर, लक्ष्मी नगर-चिराग नगर, वर्तक नगर-भीम नगर, शास्त्री नगर व शिवाई नगर भागातील नागरिकांना या मेट्रो मार्गाचा कोणताही लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.



















