Marathi Language Initiative: प्रत्येकाला महाराष्ट्र कवेत घेईल; प्रताप सरनाईक यांचे आवाहन

महाराष्ट्रातील रोजगाराच्या संधींसाठी मराठी भाषेशी नाळ जोडणे आवश्यक आहे, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले. 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठ
महाराष्ट्रातील रोजगाराच्या संधींसाठी मराठी भाषेशी नाळ जोडणे आवश्यक आहे, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले. 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियानाला' मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. या अभियानात प्रवाशांशी संवाद साधताना मराठी भाषेचा वापर करणाऱ्या प्रत्येक चालकाला महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सन्मान करणारा दूत मानले जाते. या अभियानाच्या आढावा बैठकीत परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, ज्येष्ठ साहित्यिक प्रदीप ढवण, मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे प्रतिनिधी उपस्थित होते. सरनाईक यांनी सांगितले की, मराठी ही संवादाची भाषा नसून, ती महाराष्ट्राच्या अस्मितेचा आत्मा आहे. त्यामुळे प्रत्येकाने मराठीचा सन्मान करणे आवश्यक आहे. प्रवाशांशी संवाद साधताना मराठीचा वापर केल्यास व्यवहार सुलभ होईल आणि आपुलकीचे बंध अधिक दृढ होतील. या अभियानांतर्गत १ लाखांहून अधिक अमराठी व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांनी यशस्वीरित्या व्यवहारिक मराठीचे धडे पूर्ण केले आहेत. उर्वरित चालकांना १५ ऑगस्टपूर्वी या संधीचा लाभ घेऊन मराठी शिकण्याचे आवाहन सरनाईक यांनी केले आहे.
या अभियानाला लाखो अमराठी बांधवांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मराठी शिकण्याचा हा स्वयंस्फूर्त सहभाग म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या मराठी प्रेमाला वाहिलेली आदरांजली आहे. राज्य शासनाचा मराठी भाषा विभाग, मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सहकार्याने हे अभियान लोकचळवळीच्या स्वरूपात राबवले जात आहे. सरनाईक यांनी सांगितले की, १५ ऑगस्टपर्यंत सर्व अमराठी व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांना प्रशिक्षण पूर्ण करून व्यवहारिक मराठी आत्मसात करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 'मराठीचा सन्मान, प्रवाशांशी आत्मीय संवाद आणि महाराष्ट्राशी भावनिक नाते' या त्रिसूत्रीवर हे अभियान अधिक व्यापकपणे पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. मराठी शिकण्याची संधी स्वीकारणारा प्रत्येक चालक हा केवळ नियमांचे पालन करणारा नव्हे, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सन्मान करणारा संवेदनशील नागरिक ठरत आहे, असे त्यांनी नमूद केले.



















