Historical Portrait of Chhatrapati Shahu Maharaj: छत्रपती शाहू महाराजांचे राजवेशातील चित्र प्रकाशात, ऐतिहासिक स्मृतींना उजाळा

सातारा: मराठा साम्राज्याच्या इतिहासात छत्रपती शाहू महाराजांचा ठसा अद्वितीय आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत मराठ्यांच्या साम्राज्याचा विस्तार साधला आणि दिल्लीपासू
सातारा: मराठा साम्राज्याच्या इतिहासात छत्रपती शाहू महाराजांचा ठसा अद्वितीय आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत मराठ्यांच्या साम्राज्याचा विस्तार साधला आणि दिल्लीपासून दक्षिण भारतापर्यंत वर्चस्व निर्माण केले. त्यांच्या राजवेशातील, पूर्णाकृती आणि दुर्मिळ चित्र प्रथमच समोर आले आहे, अशी माहिती इतिहास अभ्यासक निलेश झोरे यांनी दिली. हे चित्र केवळ एक कलाकृती नसून मराठा साम्राज्याच्या ऐतिहासिक वैभवाचा एक अमूल्य ठेवा आहे. या चित्रात छत्रपती शाहू महाराज राजेशाही थाटात, पूर्ण आकारात उभे आहेत. त्यांच्या मस्तकावर रत्नजडित मंदिल असून, कपाळावर विष्णूनाम स्पष्टपणे अंकित आहे. चेहऱ्यावरच्या रुबाबदार मिशा आणि शांत, अधिकारपूर्ण भावाने एक सार्वभौम सम्राटाचे व्यक्तिमत्त्व अधोरेखित केले आहे. त्यांनी परिधान केलेला गडद हिरवा राजवेश, लाल शेला, सुवर्णाचा कंबरपट्टा, गळ्यातील मोत्यांची माला आणि कानातील कुंडले यांचा समावेश आहे, जो मराठा दरबारातील समृद्धीचे प्रतीक आहे. त्यांच्या हातात असलेला राजदंड सत्तेसोबतच न्याय आणि धर्मपालनाचे प्रतीक आहे. चित्रकाराने राजेशाही दिमाख आणि सौंदर्य यांचा उत्तम समन्वय साधला आहे.
या चित्राची कलाशैली आणि ऐतिहासिक मूल्य अत्यंत महत्त्वाची आहे. महाराजांच्या निधनानंतर साधारण शंभर वर्षांनी हे चित्र रेखाटले गेले असले तरी, त्याचे सांस्कृतिक महत्त्व अनन्यसाधारण आहे. चित्रावर मराठा-दख्खनी आणि राजस्थानी चित्रपरंपरेचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. तत्कालीन समाजाने आपल्या छत्रपतींविषयी जपलेला आदर आणि राजवैभवाची कल्पना या कलाकृतीतून साकार झाली आहे. आज छत्रपती शाहू महाराजांच्या इतिहासाशी संबंधित अनेक कागदपत्रे नव्याने समोर येत आहेत, ज्यामुळे त्यांच्या कार्याचा इतिहास अधिक व्यापकपणे उलगडत आहे.



















