Celebration of Arrival:कोल्हापूरच्या राजा गणेशाची जल्लोषात आगमन

कोल्हापूर : ढोल-ताशांच्या गजरात, विद्युत रोषणाई आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत रंकाळावेस येथील गोल सर्कल मित्रमंडळाने ‘कोल्हापूरच्या राजा’ गणेशमूर्तीचे स्वागत
कोल्हापूर : ढोल-ताशांच्या गजरात, विद्युत रोषणाई आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत रंकाळावेस येथील गोल सर्कल मित्रमंडळाने ‘कोल्हापूरच्या राजा’ गणेशमूर्तीचे स्वागत केले. हा सोहळा शुक्रवारी सायंकाळी मोठ्या उत्साहात पार पडला. गणेशोत्सवाच्या सुरुवातीसच बाप्पाच्या आगमनाने शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यंदा या सोहळ्याचे १४ वे वर्ष आहे, आणि लालबागच्या राजाच्या धर्तीवरील १३ फूट उंच गणेशमूर्ती मुंबईतील मूर्तिकार संतोष रत्नाकर कांबळी यांनी साकारली आहे. शिरोली फाटा (तावडे हॉटेल) येथे मूर्तीच्या आगमनाच्या वेळी हजारो नागरिकांनी जयघोष करत तिचे स्वागत केले. करवीर नाद ढोलपथकाच्या निनादात निघालेल्या मिरवणुकीत उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार राजेश क्षीरसागर, पुष्कराज क्षीरसागर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मंडळाचे अध्यक्ष कुणाल पाटील आणि रुपेश बागल यांच्यासह इतर पदाधिकारी मूर्ती आणण्यासाठी लालबागला गेले होते. मुस्कान लॉन परिसरात विद्युत रोषणाई आणि बेंजो पॅडच्या तालावर तरुणाईने जल्लोष केला. मूर्ती मार्केट यार्ड येथे ठेवण्यात आली असून गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला ती रंकाळा स्टँड येथील मंडपात विराजमान होणार आहे.
तावडे हॉटेल चौकात दुपारपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली होती. अनेक भाविकांनी इमारतींवरून तसेच झाडावरून गणेशाचे दर्शन घेतले. २५ हून अधिक ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून आगमन सोहळ्याचे चित्रीकरण करण्यात आले. मोबाइलवर फोटो आणि थेट प्रक्षेपण करण्यासाठी तरुणाईची मोठी लगबग दिसून आली. लहान मुलांसह महिलांचाही मोठा सहभाग होता. या उत्सवात सर्व वयोगटातील लोकांनी एकत्र येऊन आनंद साजरा केला. गर्दीच्या अनुषंगाने पोलिसांनी एकेरी वाहतूक व्यवस्था लागू केली होती, तरीही दुतर्फा वाहनांची गर्दी झाल्याने वाहतुकीवर ताण निर्माण झाला. सांगली फाटा, उजळाईवाडी, शिवाजी विद्यापीठ मार्ग तसेच महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी शहरातील सर्व पोलिस ठाण्यांचे अधिकारी, गृहरक्षक दल, राज्य राखीव दलासह वाहतूक पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.





















