Couple filmed in resort:पेंचमधील रिसॉर्टमध्ये जोडप्याचा छुपा व्हिडीओ बनवला

नागपूर जिल्ह्यातील पेंच पर्यटन स्थळाजवळील एका महागड्या रिसॉर्टमध्ये थांबलेल्या जोडप्याचा मध्यरात्री छुप्या मार्गाने व्हिडीओ बनविण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला
नागपूर जिल्ह्यातील पेंच पर्यटन स्थळाजवळील एका महागड्या रिसॉर्टमध्ये थांबलेल्या जोडप्याचा मध्यरात्री छुप्या मार्गाने व्हिडीओ बनविण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे पर्यटकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. शनिवारी रात्री, जोडपे खासगी क्षणांचा आनंद घेत असताना, त्यांना खिडकीच्या पडद्यामागे एक सावली हलताना दिसली. यामुळे त्यांनी पडद्याकडे लक्ष दिले आणि त्यांना पडद्यावर एक छोटा छिद्र दिसला. बाहेरून कोणीतरी मोबाइलच्या कॅमेऱ्यातून त्यांचे छायाचित्रण करत असल्याचे लक्षात आल्यानंतर, त्यांनी पडदा बाजूला सारला. त्यानंतर त्या व्यक्तीने खाली वाकून लपण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे जोडप्याचा संशय अधिक बळावला. संतप्त जोडप्याने तात्काळ रिसॉर्ट व्यवस्थापनाकडे तक्रार केली, परंतु व्यवस्थापनाने प्रारंभात उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला.
रविवारी सकाळी, शिवनी जिल्ह्यातील कुरई पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून चौकशी सुरू केली. या घटनेची माहिती रिसॉर्टमधील इतर पर्यटकांना झाल्याने त्यात खळबळ उडाली. संबंधित जोडप्याने या घटनेमुळे त्यांचे मनोबल कमी झाल्याने रिसॉर्ट सोडण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी या प्रकरणात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याची तयारी केली आहे, परंतु तक्रारदारांनी अद्याप पोहोचले नसल्याने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया थांबली आहे.




















