BG-2 Cotton: बीजी-२चा 'कवच' भेदलं! कपाशीवर पुन्हा गुलाबी बोंडअळीचा हल्ला; 'डोमकळ्या' दिसताच सावधान

अमरावती: यंदाच्या खरीप हंगामात १० जूनपूर्वी पेरणी केलेल्या कपाशीच्या पिकांचा विकास सध्या सुरू असताना काही शेतांमध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
अमरावती: यंदाच्या खरीप हंगामात १० जूनपूर्वी पेरणी केलेल्या कपाशीच्या पिकांचा विकास सध्या सुरू असताना काही शेतांमध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. कपाशीच्या झाडांवर 'डोमकळ्या' म्हणजेच गुलाबी बोंडअळीग्रस्त फुलांचा आढळ झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. याशिवाय, तुडतुडे, मावा आणि फुलकिडे यांसारख्या रसशोषक किडींचा प्रादुर्भावही वाढत असल्याने सुरुवातीच्या टप्प्यातच कपाशीचे पीक किडींच्या विळख्यात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना या समस्येचा सामना करण्यासाठी योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे.
गुलाबी बोंडअळीचा वाढता प्रादुर्भाव हा केवळ यंदाच्या हंगामातील एक समस्या नसून, बीटी कपाशीतील जनुकांची घटती प्रभावीता, कीटकनाशकांचा अतिवापर आणि शेतातील पीक अवशेष व्यवस्थापनाच्या अभावामुळे ही समस्या अधिक गंभीर होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. नागपूर येथील बीज परीक्षण प्रयोगशाळेच्या अहवालानुसार, बाजारात उपलब्ध असलेल्या काही बीटी बियाण्यांमध्ये बीटी जनुकांचा अभाव किंवा अत्यंत कमी प्रमाण असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बीजी-२ तंत्रज्ञानाचा अपेक्षित परिणाम काही ठिकाणी दिसत नसल्याची बाब पुढे आली आहे. बीटी कपाशीमध्ये बोंडअळीचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी विशिष्ट बीटी जनुकांचा वापर केला जातो, परंतु काही वाणांमध्ये आवश्यक प्रमाणात बीटी प्रोटीन उपलब्ध नसल्यास बोंडअळीवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता कमी होऊ शकते.





















