Wild Leopard Sighting in Lonavala: लोणावळ्यात बिबट्याचे दर्शन; पर्यटकांच्या कॅमेऱ्यात बिबट्या कैद, वनविभागाकडून सतर्कतेचे आवाहन

लोणावळा : लोणावळ्यातील निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत असलेल्या पर्यटकांना अचानक बिबट्याचे दर्शन झाले. आयएनएस शिवाजी परिसरातील वळणदार रस्त्यावर दुचाकीवरून जात असताना
लोणावळा : लोणावळ्यातील निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत असलेल्या पर्यटकांना अचानक बिबट्याचे दर्शन झाले. आयएनएस शिवाजी परिसरातील वळणदार रस्त्यावर दुचाकीवरून जात असताना एक बिबट्या रस्ता ओलांडताना एका पर्यटकाच्या मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि लोकांमध्ये चर्चा सुरू आहे. लोणावळा परिसरात पावसाळ्यामुळे निसर्गाची हिरवळ वाढली आहे, त्यामुळे पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. धबधबे आणि निसर्गरम्य स्थळे पाहण्यासाठी लोक येथे येत आहेत. शहराच्या आजूबाजूच्या डोंगररांगा आणि जंगलात वन्य प्राण्यांचा वावर वाढला आहे. आयएनएस शिवाजी परिसरात पर्यटक निसर्गाचे फोटो काढत असताना अचानक बिबट्या रस्त्यावर येताना दिसला आणि एका पर्यटकाने त्याचे चित्रीकरण केले. या घटनेमुळे पर्यटकांमध्ये थोडी भिती निर्माण झाली आहे.
आंदर मावळ परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्याचे दर्शन झाल्याच्या बातम्या येत आहेत. आता लोणावळ्यातील आयएनएस शिवाजी परिसरात बिबट्या आढळल्यामुळे स्थानिक नागरिक आणि पर्यटकांमध्ये चिंता वाढली आहे. पावसाळ्यात वन्य प्राणी खाद्याच्या शोधात मानवी वस्तीच्या जवळ येऊ शकतात, त्यामुळे नागरिकांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. वनविभागाने नागरिकांना सूचना दिली आहे की, रात्रीच्या वेळी एकट्याने जंगल परिसरात जाणे टाळावे आणि वाहन चालवताना रस्त्याच्या कडेला लक्ष ठेवावे. बिबट्या किंवा अन्य वन्य प्राण्यांना दिसल्यास त्यांच्याकडे जवळ जाणे, फोटो किंवा व्हिडीओ काढण्यासाठी पाठलाग करणे किंवा त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न करणे टाळावे. वन्य प्राण्याला सुरक्षित अंतरावरूनच पाहावे आणि घटनेची माहिती तात्काळ वनविभागाला द्यावी.





















