Truck Driver Penalized:समृद्धी महामार्गावर ट्रक आडवा लावणाऱ्या ट्रकचालकावर अखेर कारवाई

अमरावती: समृद्धी महामार्गावर आरटीओ अधिकाऱ्यांशी झालेल्या वादानंतर एका ट्रकचालकाने कंटेनर ट्रक रस्त्यावर आडवा लावून वाहतूक ठप्प केल्याची घटना रविवारी घडली होती.
अमरावती: समृद्धी महामार्गावर आरटीओ अधिकाऱ्यांशी झालेल्या वादानंतर एका ट्रकचालकाने कंटेनर ट्रक रस्त्यावर आडवा लावून वाहतूक ठप्प केल्याची घटना रविवारी घडली होती. या घटनेने संपूर्ण राज्यात चर्चा निर्माण केली. या प्रकरणात संबंधित ट्रकचालकावर आता कारवाई करण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर ९ ऑगस्ट रोजी कंटेनर वाहन क्रमांक एचआर ५५/ बीए ८५४४ च्या चालकाने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनमध्ये वाहन उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याचे स्पष्ट झाले. या वाहनाची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये नागपूर येथून पुणे येथे जाणारा माल लोड असल्याचे आढळले. वाहन राष्ट्रीय महामार्गाच्या अटी व शर्तींचे उल्लंघन करीत असल्याने संबंधित वाहनावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या प्रकरणी वाहन चालकावर वर्धा जिल्ह्यातील सावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे वाहतूक सुरक्षेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे.
समृद्धी महामार्गावर वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध परिवहन विभागाने कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. समृद्धी महामार्गाच्या नोडल अधिकारी आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी याबाबत वाहनधारक व चालकांना विशेष सूचना दिल्या आहेत. महामार्गावर वाहनांचा वेग मोठ्या प्रमाणात असल्याने, कोणत्याही कारणास्तव वाहन बंद पडल्यास किंवा थांबवावे लागल्यास, ते सुरक्षित ठिकाणी हलविणे अत्यंत आवश्यक आहे. महामार्गाच्या मुख्य मार्गावर किंवा वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा ठिकाणी वाहन उभे करणे धोकादायक ठरू शकते, ज्यामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता असते, असे प्रादेशिक परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.





















