Bullet Train Project Discussion: फलटण विरुद्ध बारामती संघर्षाची शक्यता वाढली

फलटण : केंद्र सरकारने मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी ६ हजार कोटी रुपयांची तरतूद केल्यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या मार्गावर पुन्हा चर्चा सुरू झ
फलटण : केंद्र सरकारने मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी ६ हजार कोटी रुपयांची तरतूद केल्यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या मार्गावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. या प्रकल्पाच्या मार्गाबाबत सध्या जोरदार चर्चा चालू आहे, ज्यामध्ये फलटण तालुक्यातील शिंदेवाडी मार्गाने जाण्याऐवजी मुंबई-पुणे-बारामती-हैदराबाद असा मार्ग स्वीकारण्याबाबत विचार केला जात आहे. फलटण तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे बारामतीकडे वळविला जाणार का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. यामुळे बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि माढ्याचे माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यातील राजकीय संघर्षाची शक्यता वाढली आहे. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव मांडला होता आणि त्यांनी फलटण तालुक्यातील शिंदेवाडी येथे स्थानक उभारण्याची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचा दावा त्यांच्या समर्थकांनी केला आहे. त्यामुळे बारामतीमार्गे प्रकल्पासाठी सुप्रिया सुळेंच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे.
सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नांमुळे बुलेट ट्रेनचा मार्ग बारामतीमार्गे नेण्यासाठी केंद्र पातळीवर चर्चा सुरू आहे. यामुळे फलटणकरांचे लक्ष शिंदेवाडीमार्गे जाणाऱ्या प्रस्तावाच्या भवितव्याकडे लागले आहे. दुसरीकडे, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची या प्रकल्पाबाबतची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. शिंदेवाडी येथे स्थानक उभारण्याबाबत त्यांच्या पातळीवर कोणत्या हालचाली सुरू आहेत, याबाबत स्थानिक पातळीवर चर्चा सुरू आहे. फलटणच्या पाण्याच्या प्रश्नावरून यापूर्वी सुप्रिया सुळे आणि रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यात संघर्ष झाला होता. नीरा-देवघरच्या पाण्याच्या प्रश्नावरून दोन्ही नेत्यांच्या भूमिका एकमेकांच्या विरोधात आल्या होत्या. आता बुलेट ट्रेनच्या मार्गावरूनही दोन्ही नेत्यांच्या राजकीय भूमिका पुन्हा आमनेसामने येणार का, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.





















