Reservation Debate:आरक्षण बंद करावे का?

दिल्लीच्या जंतर-मंतरवर नीट पेपरफुटीप्रकरणाविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असताना, सोशल मीडियावर ‘आरक्षण हटावो’ मोहिमेचा जोर वाढला आहे. सध्या तरुणांमध्ये आरक
दिल्लीच्या जंतर-मंतरवर नीट पेपरफुटीप्रकरणाविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असताना, सोशल मीडियावर ‘आरक्षण हटावो’ मोहिमेचा जोर वाढला आहे. सध्या तरुणांमध्ये आरक्षणाबाबत विविध विचार व्यक्त केले जात आहेत. याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना विचारण्यात आले असता, त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “जोपर्यंत देशात सामाजिक भेदभाव आणि विषमता अस्तित्वात आहे, तोपर्यंत आरक्षण कायम राहिले पाहिजे.” भागवत यांचे हे विधान आरक्षणाच्या मुद्द्यावर एक महत्त्वाचे व स्पष्ट मत आहे. हे लक्षात घेतल्यास, आरक्षणाची गरज आणि त्याचे महत्त्व यावर चर्चा करणे आवश्यक आहे.
मुंबईतील नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्र येथे ‘इंडियाज इंटरनॅशनल मुव्हमेंट टू युनायटेड नेशन्स’च्या १५ व्या वर्धापन दिन सोहळ्यात भागवत यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात देशभरातून आलेल्या जेन-झी आणि जेन-अल्फा पिढीतील २,००० तरुणांशी त्यांनी संवाद साधला. आयआयएमयूएनचे संस्थापक ऋषभ शाह यांनी यावेळी भागवत यांना जंतर-मंतरवरील आंदोलन, आरक्षण आणि तरुणांना भेडसावणाऱ्या समस्यांवर अनेक प्रश्न विचारले. शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण कमी करण्याची वेळ आली आहे का? असा प्रश्न शाहने विचारला. या प्रश्नावर भागवत यांनी थेट उत्तर देण्यास नकार दिला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टिकोनातून आरक्षणाकडे पाहण्याचे आवाहन केले.



















