Political Anticipation for Voters List:अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या प्रारूप मतदार यादीची राजकीय क्षेत्राला प्रतिक्षा

अहिल्यानगर: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी कधी प्रसिद्ध होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सध्या बँ
अहिल्यानगर: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी कधी प्रसिद्ध होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सध्या बँकेच्या सभासद मतदारांच्या ठरावांची पडताळणी बँक व सहकार विभागाकडून सुरू आहे. यामुळे प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होण्यासाठी किमान आठवड्याचा कालावधी लागेल, अशी माहिती सहकार विभागाने दिली आहे. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची मुदत गेल्या फेब्रुवारीमध्ये संपली होती, त्यामुळे आता बँकेचा कारभार प्रशासकाच्या हाती आहे. सहकार विभागाच्या सहनिबंधक संगीता डोंगरे या प्रशासक पदाची सूत्रे सांभाळत आहेत. बँकेच्या सभासद असलेल्या विविध सहकारी सेवा संस्थांना १७ जून ते १६ जुलै या कालावधीत मतदार यादी तयार करण्यासाठी ठराव पाठवण्याची मुदत देण्यात आली होती.
जिल्हा बँकेचे एकूण ५८९० सभासद आहेत. यामध्ये विकास सेवा संस्थांची संख्या १४१४ असून, त्यामध्ये ठराव १३६७ आहेत. बिगर शेती संस्थांची संख्या २३३७ असून, त्यामध्ये ठराव १५१८ आहेत. शेतीपूरक संस्थांची संख्या २१३९ असून, त्यामध्ये केवळ २४३ ठराव संकलीत झाले आहेत. एकूण ३१२८ ठराव संकलीत झाले आहेत. यानंतर ही यादी विभागीय सहनिबंधक तसेच बँकेच्या निवडणूक अधिकाऱ्यांकडे नाशिकला मान्यतेसाठी पाठविण्यात आली आहे. सभासद शुल्क न भरलेले, अवसायानात गेलेले, बंद पडलेले, नोंदणी रद्द झालेल्या, विलीनीकरण झालेल्या संस्थांची नावे वगळण्यासाठी पडताळणी चालू आहे. त्यामुळे मतदार संख्येमध्ये घट होण्याची शक्यता आहे.




















