Political Strategy Insights:प्रशांत किशोरांना पक्ष सल्लागार नेमल्याचे माहिती नाही

मुंबई : प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेससाठी (अजित पवार) कार्यरत आहेत, याबाबत मला काहीही माहिती नाही. त्यांना सल्लागार म्हणून नियुक्
मुंबई : प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेससाठी (अजित पवार) कार्यरत आहेत, याबाबत मला काहीही माहिती नाही. त्यांना सल्लागार म्हणून नियुक्त केले असल्यास, मला त्याची माहिती नक्कीच असती. प्रदेशाध्यक्षपदावरून मला हटवण्याचा सल्ला किशोर यांनी दिला असावा, असे मला वाटत नाही. राजकीय सल्लागारांवर अवलंबून राहण्यापेक्षा जनतेत मिसळून काम केल्यानेच यश मिळते, यावर मी ठाम विश्वास ठेवतो, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी केले.
प्रशांत किशोर यांच्यासोबत शुक्रवारी राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांची बैठक झाली. या बैठकीत तटकरे यांच्याबाबत किशोर यांनी नाराजी व्यक्त केल्याच्या बातम्या समोर आल्या. तटकरे यांनी पत्रकार परिषदेत या बातम्या निराधार असल्याचे स्पष्ट केले. भाजप अध्यक्ष नितीन नबीन यांच्या मतदारसंघात भाजप उमेदवाराला पराभूत करून किशोर अलीकडेच बिहार विधानसभेत निवडून आले आहेत. यामुळेच प्रशांत किशोर यांनी सुनेत्रा पवार आणि पार्थ यांची भेट घेणे भाजपला रुचले नसावे, असे तटकरे यांचे मत आहे.
मी १९८४ पासून राजकारणात सक्रिय आहे. मात्र, मला कधीही सल्लागाराची आवश्यकता भासली नाही. अजित पवार आणि मी एकत्रितपणे महाराष्ट्रातील विविध भागांचा दौरा केला आहे, ज्यामुळे आमदारांची संख्या ४१ वर पोचली आहे. प्रशांत किशोर यांच्यासोबत यापूर्वी बैठकांमध्ये मी उपस्थित राहिलो आहे. त्यांची सुनेत्रा पवार यांच्याशी झालेली भेट औपचारिक होती, असे मला सांगण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सध्या भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीत आहे. प्रशांत किशोर हे भाजप उमेदवाराला पराभूत करून बांकीपूरमधून निवडून आले आहेत, असे तटकरे म्हणाले.
मी एक व्यावसायिक राजकारणी आहे. मी आठ निवडणुका लढविल्या आहेत. मी कधीही मतदारसंघाचे सर्वेक्षण केलेले नाही. सिद्धांतावर माझा विश्वास नाही, मी मैदानावर काम करणारा कार्यकर्ता आहे. नेतृत्वाने मतदारांना गृहीत धरू नये, यावरच १९९९ पासून राष्ट्रवादीची वाटचाल झाली आहे. पक्षात कोणतेही गटतट नाहीत, आमच्यात संवाद नाही, या सर्व बातम्या निराधार आहेत. सध्या होणाऱ्या नव्या नियुक्त्या माझ्या सहमतीने झालेल्या आहेत, असे तटकरे यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत पुण्यातील संजय काकडे यांनी शरद पवार यांच्यावर केलेली टीका चुकीची असल्याचे त्यांनी सांगितले. अजित पवार यांच्यासोबत घेतलेल्या निर्णयात शरद पवार यांच्यावर टीका करायची नाही, असे ठरवले होते. त्यामुळे काकडे यांच्यासह सर्वांना याबाबत समज दिला जाईल, असे सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.



















