Political Turmoil in Tiwsa:तिवसा मतदारसंघात बदल निश्चित आहे!

अमरावती: भाजपमध्ये सध्या अंतर्गत संघर्ष अधिक तीव्र होत चालला आहे. माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार प्रवीण पोटे यांच्यातील तणाव सर्वत्र चर्चेत आहे. याच पार्श्वभू
अमरावती: भाजपमध्ये सध्या अंतर्गत संघर्ष अधिक तीव्र होत चालला आहे. माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार प्रवीण पोटे यांच्यातील तणाव सर्वत्र चर्चेत आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा यांच्या नुकत्याच केलेल्या वक्तव्यामुळे एक नवा वाद उभा राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रविराज देशमुख यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या शुभेच्छा सोहळ्यात बोलताना रवी राणा यांनी स्पष्टपणे सांगितले की, 'तिवसा मतदारसंघात बदल निश्चित आहे आणि तो मीच करणार आहे.' यामुळे त्यांनी तिवसाचे भाजप आमदार राजेश वानखडे यांना अप्रत्यक्षपणे आव्हान दिले आहे. यामुळे भाजपच्या अंतर्गत राजकारणात आणखी एक चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.
भाजपच्या अमरावती ग्रामीण जिल्हाध्यक्षपदावरून रविराज देशमुख यांना हटवून त्यांच्या जागी आमदार प्रताप अडसड यांची नियुक्ती करण्यात आली होती. याशिवाय शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांच्या जागी नितीन गुडधे यांची नियुक्ती गेल्या महिन्यात करण्यात आली, परंतु चोवीस तासांच्या आत नवीन शहराध्यक्षाच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली. तरीदेखील ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाचा बदल कायम ठेवण्यात आला. यामुळे रविराज देशमुख यांच्यावर अन्याय झाल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये व्यक्त होत आहे. आमदार प्रवीण पोटे यांच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी राणा दाम्पत्याने प्रयत्न सुरू केल्याची चर्चा सध्या जोरात आहे.



















