No Worries, I Am With You: पंतप्रधान मोदींचा फुटीर खासदारांना स्पष्ट संदेश

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी बंडखोरीनंतर पहिल्यांदाच ‘रालोआ’ आघाडीमध्ये सामील झालेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या आणि तृणमूल काँग्रेसच्या फुटी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी बंडखोरीनंतर पहिल्यांदाच ‘रालोआ’ आघाडीमध्ये सामील झालेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या आणि तृणमूल काँग्रेसच्या फुटीर खासदारांना एक स्पष्ट संदेश दिला. ‘काळजी करू नका, मी तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी आहे, कोणालाही चिंता करण्याची गरज नाही,’ असे त्यांनी सांगितले. मोदींच्या या संदेशाने खासदारांमध्ये एक सकारात्मक वातावरण निर्माण झाले. पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी आपल्या निवासस्थानी ‘रालोआ’च्या ४१ खासदारांशी संवाद साधला. या संवादामध्ये ठाकरे गटातील फुटीर ६ खासदार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे २ खासदार आणि तृणमूल काँग्रेसमधील २० फुटीर खासदारांचा समावेश होता. मोदींनी यावेळी ‘रालोआ’ हे एक कुटुंब असल्याचे सांगत प्रत्येक घटक पक्ष आणि खासदाराला समान संधी मिळेल, असे स्पष्ट केले. ‘मी केवळ एका पक्षासोबत नाही, तर ‘रालोआ’च्या प्रत्येक खासदाराच्या पाठीशी उभा आहे,’ असे त्यांनी सांगून खासदारांना धीर दिला.
मोदींनी सर्व ‘रालोआ’ खासदारांना त्यांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी थेट पंतप्रधान कार्यालयाशी (पीएमओ) संपर्क साधण्याचा सल्ला दिला. ‘आपल्या मतदारसंघातील विकासकामांसाठी पीएमओशी थेट संपर्क ठेवा. गरीब, शेतकरी, कामगार यांच्यापर्यंत पोहोचा आणि त्यांच्या समस्या समजून घ्या,’ असे त्यांनी सांगितले. यावेळी राजकीय वातावरणावर भाष्य करताना मोदींनी खासदारांना दिल्लीतील राजकीय चर्चांच्या आणि अफवांच्या भोवऱ्यात न अडकण्याचा सल्ला दिला. विरोधी पक्षांच्या खासदारांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. संसदीय लोकशाहीतील संवादाचे महत्त्व लक्षात घेत, मोदींनी प्रत्येक खासदाराशी स्वतंत्रपणे संवाद साधला आणि त्यांच्या प्रकृतीची, कुटुंबाची चौकशी केली.



















