IAF Wing Commander Honey Trap:IAF चा विंग कमांडर हनी ट्रॅपचा बळी; पाकिस्तानी हस्तकांना संवेदनशील माहिती दिल्यामुळे खळबळ

भारतीय हवाई दलाच्या (iaf) एका विंग कमांडरवर हनी ट्रॅपच्या माध्यमातून संवेदनशील माहिती उघड करण्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. दोन महिन्यांपूर्वी या अधिकाऱ्याला
भारतीय हवाई दलाच्या (IAF) एका विंग कमांडरवर हनी ट्रॅपच्या माध्यमातून संवेदनशील माहिती उघड करण्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. दोन महिन्यांपूर्वी या अधिकाऱ्याला अटक करण्यात आली होती आणि याबाबत दिल्ली पोलिसांनी सध्या तपास सुरू केला आहे. या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यावर गोपनीयतेच्या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ज्यामुळे तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता, दिल्ली पोलिसांनी यामागे एक मोठी गुप्तचर साखळी कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला आहे, ज्यामुळे भारतीय लष्कराशी संबंधित महत्त्वाची माहिती बाहेर येऊ शकते. पोलिसांच्या माहितीनुसार, या विंग कमांडरने पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांच्या हनी ट्रॅपमध्ये अडकले असून, त्याने एका सहकाऱ्याच्या मोबाइलमध्ये डेटा चोरणारे सॉफ्टवेअर इन्स्टॉल केले होते. भारतीय हवाई दलाच्या गुप्तचर विभागाने या प्रकरणाची माहिती दिल्यानंतर ३१ मे रोजी या विंग कमांडरला अटक करण्यात आली.
या विंग कमांडरच्या वैयक्तिक आयुष्यातील अडचणींचा फायदा घेत, एका महिलेने त्याच्याशी सोशल मीडियावर संवाद साधला. हळूहळू त्यांच्यातील संवाद वाढला आणि ते व्हिडीओ कॉलवरही बोलू लागले. पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेने विंग कमांडरचा विश्वास संपादन केल्यानंतर त्याच्याकडून लष्करी तुकड्यांच्या हालचालींची माहिती, फोटो आणि व्हिडीओ मागितले. या महिलेच्या मागे पाकिस्तानी हँडलर्स असल्याचा पोलिसांचा संशय आहे. या अधिकाऱ्याने या महिलेच्या इशाऱ्यावर महत्त्वाची कागदपत्रे आणि डेटा पाठवला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.





















