Environmental Protest:पर्यावरणीय गुन्ह्यांच्या निष्पक्ष तपासासाठी पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर पर्यावरणप्रेमींचे आंदोलन

वसई: मिरा भाईंदर आणि वसई विरार आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात पर्यावरणीय गुन्ह्यांच्या निष्पक्ष तपासणीसाठी पर्यावरणप्रेमींनी शुक्रवारी पोलीस आयुक्तालयाबाहेर शांत
वसई: मिरा भाईंदर आणि वसई विरार आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात पर्यावरणीय गुन्ह्यांच्या निष्पक्ष तपासणीसाठी पर्यावरणप्रेमींनी शुक्रवारी पोलीस आयुक्तालयाबाहेर शांततापूर्ण आंदोलन केले. या आंदोलनात त्यांनी विविध फलक हातात धरले होते, ज्यावर 'निष्पक्ष तपास करा, पर्यावरणाला न्याय द्या', 'पर्यावरणीय गुन्ह्यांचा तपास पारदर्शक करा', 'कांदळवन वाचवा', 'नो मँग्रोव्ह्स, नो फ्युचर' असे संदेश होते. या आंदोलनानंतर, एक शिष्टमंडळ पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांच्याकडे आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यासाठी गेले. या निवेदनात त्यांनी २००५ ते २०२५ या कालावधीत नोंद झालेल्या २०० हून अधिक पर्यावरणीय गुन्ह्यांची विशेष तपासणी करण्याची मागणी केली आहे. यामध्ये पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, १९८६ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यांच्या तपासणीसाठी आवश्यक असलेल्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेचीही चौकशी करण्यात यावी, असे त्यांनी नमूद केले आहे.
आंदोलनकर्त्यांनी यावेळी स्पष्ट केले की, पर्यावरणीय गुन्ह्यांच्या तपासात संथ गती आणि दोषींवर ठोस कारवाईचा अभाव यामुळे शहरातील निसर्गद्रोही आणि कथित पर्यावरण भूमाफिया मोकाटपणे कार्यरत आहेत. नागरिकांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे की, जर अशा व्यक्तींवर वेळेत आणि प्रभावी कारवाई करण्यात आली नाही, तर शहरातील कांदळवने, जलस्रोत, जैवविविधता आणि नैसर्गिक संपत्तीचे अपरिमित नुकसान होऊ शकते. त्यामुळे, पर्यावरणप्रेमींनी प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे.



















