CBI Files Charges in NEET Paper Leak: नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात सीबीआयने आरोपपत्र दाखल केले

नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) ‘नीट-यूजी २०२६’ प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात १३ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. दिल्लीतील राऊस एव्हेन्यू ये
नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) ‘नीट-यूजी २०२६’ प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात १३ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. दिल्लीतील राऊस एव्हेन्यू येथील विशेष सीबीआय न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या या आरोपपत्रात ‘एनटीए’च्या तज्ज्ञांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. मनीषा मांधरे (वनस्पतीशास्त्र), प्रल्हाद कुलकर्णी (रसायनशास्त्र) आणि मनीषा हवालदार (भौतिकशास्त्र) यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच बेकायदा पद्धतीने मिळवल्या आणि त्या इतर सहआरोपींना पुरवल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रकरणात आरोपींनी प्रश्नपत्रिका टेलिग्राम, व्हॉट्सॲप आणि इतर डिजिटल माध्यमांद्वारे शिकवणी चालक, दलाल आणि उमेदवारांपर्यंत पोहोचवल्या, ज्यामुळे लाखो रुपयांची देवाणघेवाण झाली. आरोपी तेजस शहा, शिवराज मोटेगावकर, डॉ. मनोज शिरुरे, मनीषा वाघमारे, धनंजय लोखंडे, शुभम खैरनार, यश यादव, मांगीलाल बिव्हाल, दिनेश बिव्हाल आणि विकास बिव्हाल यांनी या वितरणात महत्त्वाची भूमिका बजावली. जप्त केलेले मोबाइल, पेन ड्राइव्ह, व्हॉट्सॲप चॅट आणि कागदपत्रांच्या न्यायवैद्यक तपासणीतून प्रश्नपत्रिकांच्या चोरीचा कट सिद्ध झाला आहे.
सीबीआयने या पेपरफुटी प्रकरणात भारतीय न्याय संहिता, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि सार्वजनिक परीक्षा (अनुचित प्रकारास प्रतिबंध) कायदा, २०२४ अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. हा गुन्हा म्हणजे राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या विषयतज्ज्ञ, मध्यस्थ, शिकवणी चालक आणि उमेदवारांचा समावेश असलेला एक सुसंघटित आणि बहुराज्यीय गुन्हेगारी कट असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. प्रश्नपत्रिका तयार करणे, भाषांतर आणि पुनर्भाषांतराचे काम सुरू असताना या तज्ज्ञांनी प्रक्रियेतील त्रुटींचा गैरफायदा घेतला. हॉटेलच्या खोलीत परतल्यानंतर त्यांनी प्रश्न आठवून कच्च्या नोंदी किंवा चिठ्ठ्यांच्या साहाय्याने प्रश्न पुन्हा तयार केले. हे प्रश्न राजस्थान आणि हरियाणापर्यंत पोहोचवण्यासाठी मनीषा वाघमारे या ब्यूटी पार्लरचालकाने मध्यस्थांच्या जाळ्याचा वापर केला.





















