Analysis:कायदा कठोर केल्याने बनावट जातवैधता प्रमाणपत्रांना आळा बसेल का?

जातवैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आरक्षित प्रवर्गातील व्यक्तींना अनेक अटींचा सामना करावा लागतो. या प्रमाणपत्रांच्या माध्यमातून शासकीय नोकरी, शिक्षण आणि इतर अनेक
जातवैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आरक्षित प्रवर्गातील व्यक्तींना अनेक अटींचा सामना करावा लागतो. या प्रमाणपत्रांच्या माध्यमातून शासकीय नोकरी, शिक्षण आणि इतर अनेक सुविधांचा लाभ घेता येतो. तथापि, बनावट कागदपत्रांच्या आधारे जातवैधता प्रमाणपत्र मिळवण्याचे अनेक प्रकरणे समोर आले आहेत. यामुळे खरे लाभार्थी वंचित राहतात. या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने कठोर कायदा केला आहे. या कायद्यानुसार, बनावट कागदपत्र सादर करणाऱ्यांविरोधात फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय, सादर केलेल्या प्रमाणपत्रांची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे, ज्यामुळे गैरप्रकारांना आळा बसण्याची अपेक्षा आहे.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग आणि भटक्या-विमुक्त प्रवर्गातील नागरिकांना जातवैधता प्रमाणपत्र आवश्यक असते. या प्रमाणपत्राशिवाय शासकीय नोकरी, व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाचा लाभ घेता येत नाही. अनेक लोकांना प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे नोकरी गमवावी लागली आहे, तर काही लोकप्रतिनिधींचे सदस्यत्वही रद्द झाले आहे. जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी महसूल विभागाकडून अर्ज करावा लागतो. अर्ज सादर केल्यानंतर जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे तपासणीसाठी पाठवले जाते. यामध्ये आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केली जाते.



















