Understanding Why We Forget Dreams:स्वप्न विसरण्याचं कारण जाणून घ्या

रात्री झोपताना प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी विविध प्रकारची स्वप्नं पडतात. काही स्वप्नं आपल्या मनाला भावतात, तर काही विचित्र किंवा भयानक असतात. झोपेतून जागे झाल
रात्री झोपताना प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी विविध प्रकारची स्वप्नं पडतात. काही स्वप्नं आपल्या मनाला भावतात, तर काही विचित्र किंवा भयानक असतात. झोपेतून जागे झाल्यावर काही क्षणांसाठी आपण त्या स्वप्नांच्या जगात असतो, पण डोळे उघडताच त्या स्वप्नांचा मागोवा घेताना आपण विसरतो. स्वप्न विसरण्याचं कारण काय आहे? हे एक महत्त्वाचं प्रश्न आहे. स्वप्न पाहिल्यानंतर आपल्या मेंदूने ती आठवण का ठेवत नाही, यामागे विज्ञानात काही कारणं आहेत. आपल्या मेंदूमध्ये हिप्पोकॅम्पस नावाचा एक महत्त्वाचा भाग आहे, जो स्मरणशक्तीच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतो. साध्या भाषेत सांगायचं झालं तर, दिवसभरात घडणाऱ्या गोष्टींच्या आठवणी साठवण्यात हिप्पोकॅम्पस मदत करतो. मात्र, झोपेत असताना हिप्पोकॅम्पसची कार्यपद्धती बदलते, ज्यामुळे स्वप्नांच्या घटनांचा दीर्घकाळ टिकणाऱ्या आठवणींमध्ये रूपांतर होण्याची शक्यता कमी होते. त्यामुळे सकाळी जाग आल्यानंतर स्वप्न विसरणं सामान्य आहे. स्वप्न विसरण्याचं आणखी एक कारण म्हणजे नॉरपेनेफ्रिन हा न्यूरोट्रांसमीटर. झोपेच्या काही टप्प्यांमध्ये, विशेषतः स्वप्नांच्या काळात, या रसायनाची पातळी कमी असते. त्यामुळे स्वप्नातील अनुभव कायमस्वरूपी आठवण म्हणून साठवला जाण्याची शक्यता कमी होते. यामुळेच डोळे उघडताच स्वप्न विसरणं स्वाभाविक आहे. तथापि, काही स्वप्नं मात्र आपल्याला अधिक काळ लक्षात राहतात. यामागे स्वप्नाच्या वेळी निर्माण झालेली भावनिक तीव्रता महत्त्वाची ठरते. उदाहरणार्थ, भयानक स्वप्न पाहताना अचानक जाग येणे, त्याचा शेवट अधिक स्पष्टपणे लक्षात राहतो. त्याचप्रमाणे आनंददायी किंवा दुःखद स्वप्नांचाही मनावर खोल परिणाम होतो, ज्यामुळे ती स्वप्नं अधिक काळ लक्षात राहतात. जर तुम्हाला तुमची स्वप्नं लक्षात ठेवायची असतील, तर सकाळी जागे झाल्यावर लगेच उठू नका. काही क्षण शांतपणे पडून राहा आणि स्वप्नात काय घडलं, कोण होतं, याचा विचार करा. स्वप्नातील कोणतीही घटना, व्यक्ती किंवा दृश्य लक्षात आलं तरी ते लगेच लिहून ठेवा. यासाठी पलंगाजवळ डायरी ठेवणं उपयुक्त ठरू शकतं. त्यामुळे सकाळी उठल्यावर स्वप्न विसरणं ही असामान्य गोष्ट नाही, उलट, स्वप्न आणि स्मरणशक्ती यांच्यातील नातं आपल्या मेंदूच्या कार्यपद्धतीची एक झलक दाखवतं. रात्रीच्या स्वप्नांचं जग कितीही खरं वाटलं, तरी जाग आल्यानंतर ते हळूहळू विसरलं जाणं हे आपल्या मेंदूच्या अद्भुत प्रक्रियेचं परिणाम आहे.





















