New 24-Hour Blood Purification Center: सेंट जॉर्ज रुग्णालयात आता ऑक्सिजन उपचारांसह २४ तास रक्तशुद्धीकरण केंद्र

मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयाने अपघात, मधुमेहामुळे झालेल्या जखमांच्या उपचारांसाठी हायपरबॅरिक ऑक्सिजन थेरपी (एचबीओटी) केंद्र सुरू केले आहे. यामुळे जे. जे. रुग्णा
मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयाने अपघात, मधुमेहामुळे झालेल्या जखमांच्या उपचारांसाठी हायपरबॅरिक ऑक्सिजन थेरपी (एचबीओटी) केंद्र सुरू केले आहे. यामुळे जे. जे. रुग्णालयात पाठविण्यात येणाऱ्या रुग्णांना आता सेंट जॉर्ज रुग्णालयातच आवश्यक उपचार मिळणार आहेत. याशिवाय, रुग्णालयातील रक्तशुद्धीकरण केंद्र आता २४ तास कार्यरत राहणार आहे, ज्यामुळे रुग्णांना अधिक सोयीसाठी सुविधा उपलब्ध होणार आहे. हे केंद्र अपघातानंतर किंवा मधुमेहामुळे जखम बऱ्या होत नसलेल्या रुग्णांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. एचबीओ थेरपी दरम्यान रुग्णांना ४५ ते १२० मिनिटे उपचार दिले जातात, ज्यामुळे त्यांच्या जखमांची प्रकृती लवकर सुधारते. यापूर्वी, सेंट जॉर्ज रुग्णालयात हे केंद्र नसल्यामुळे आठवड्यातून सात ते आठ रुग्णांना जे. जे. रुग्णालयात पाठवण्यात येत होते, ज्यामुळे रुग्णांना प्रवासाच्या त्रासाला सामोरे जावे लागे. आता हे केंद्र सुरू झाल्याने रुग्णांना सेंट जॉर्ज रुग्णालयातच आवश्यक उपचार मिळणार आहे.
सेंट जॉर्ज रुग्णालयातील रक्तशुद्धीकरण केंद्राने दोन वर्षांच्या कार्यकाळात ७०० रुग्णांची नोंदणी केली आहे. या केंद्रात सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत १०,००० हून अधिक रक्तशुद्धीकरणाची सत्रे पार पडली आहेत. आपत्कालीन परिस्थितीत येणाऱ्या रुग्णांसाठी रात्रीच्या वेळीही रक्तशुद्धीकरणाची सुविधा उपलब्ध होती. तथापि, नियमित रुग्णांच्या सोयीसाठी २४ तास सुविधा उपलब्ध करणे आवश्यक असल्याची मागणी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी केली होती. यामुळे आता सेंट जॉर्ज रुग्णालयातील रक्तशुद्धीकरण केंद्र २४ तास कार्यरत राहणार असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनायक सावर्डेकर यांनी दिली आहे.



















