FDA mandates testing for blood bags: प्रत्येक रक्तपिशवीची एचआयव्ही, हिपॅटायटिस अन् मलेरिया चाचणी अनिवार्य; FDA कडून नियमावली जारी

अन्न व औषध प्रशासनाने (fda) राज्यातील रक्त बँकांच्या सुरक्षितता आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, सर्व रक्तकेंद
अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यातील रक्त बँकांच्या सुरक्षितता आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, सर्व रक्तकेंद्रे आणि रक्तसाठवण केंद्रांसाठी एक व्यापक 'अनुपालन आदेश' जारी करण्यात आला आहे. या आदेशात रक्तसंकलनापासून ते वितरणापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यासाठी स्पष्ट कार्यपद्धतींचा समावेश करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे, प्रत्येक रक्तपिशवीची एचआयव्ही, हिपॅटायटिस बी, सी, सिफिलिस आणि मलेरिया यांसाठी तपासणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. हे नियम लागू केल्याने रक्ताच्या सुरक्षिततेसाठी एक महत्त्वाचा टप्पा गाठला जाईल, ज्यामुळे दात्यांना आणि रुग्णांना सुरक्षित रक्त मिळण्याची खात्री होईल.
याशिवाय, रक्त व रक्तघटकांची योग्य तापमानात साठवणूक, कोल्ड चेन कायम ठेवणे आणि संशयित रक्तपिशव्यांसाठी स्वतंत्र क्वारंटाईन व्यवस्था ठेवणेही आवश्यक करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रक्तकेंद्रांवर कठोर कायदेशीर कारवाईची चेतावणी प्रशासनाने दिली आहे. औषधे व सौंदर्यप्रसाधने कायदा, १९४० अंतर्गत मानवी रक्त आणि त्याचे घटक 'औषध' म्हणून मानले जातात, त्यामुळे कोणत्याही संस्थेला वैध परवान्याशिवाय रक्त संकलन, प्रक्रिया, साठवण किंवा वितरण करता येणार नाही. यामुळे रक्तकेंद्रांमध्ये आवश्यक पायाभूत सुविधा, समुपदेशन कक्ष, गुणवत्ता नियंत्रण विभाग आणि रक्तघटक प्रक्रिया सुविधा उपलब्ध ठेवणे बंधनकारक आहे.




















