India's Elderly Population Growth: भारत आधी वृद्ध, मग श्रीमंत! २०५० पर्यंत प्रत्येक पाचपैकी एक नागरिक ज्येष्ठ; कमावणारे लोक होणार कमी

नवी दिल्ली : भारतात ज्येष्ठ नागरिकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. २०५० पर्यंत देशातील प्रत्येक पाचपैकी एक नागरिक ६० वर्षांवरील असेल. म्हणजेच ३४.७ कोटी लोक ज्येष
नवी दिल्ली : भारतात ज्येष्ठ नागरिकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. २०५० पर्यंत देशातील प्रत्येक पाचपैकी एक नागरिक ६० वर्षांवरील असेल. म्हणजेच ३४.७ कोटी लोक ज्येष्ठ असतील. त्यापैकी जवळपास ७० टक्के ज्येष्ठ ग्रामीण भागात राहतील, असा इशारा ट्रान्सफॉर्म रुरल इंडिया संस्थेच्या अभ्यासातून देण्यात आला आहे. या अभ्यासानुसार, विकसित देश आधी श्रीमंत झाले, नंतर त्यांच्या लोकसंख्येत वृद्धांचे प्रमाण वाढले. मात्र भारतात परिस्थिती उलट आहे. देश अजूनही आर्थिक प्रगतीच्या टप्प्यावर असतानाच ज्येष्ठांची संख्या वेगाने वाढत आहे. एका ज्येष्ठ नागरिकामागे काम करणाऱ्या वयोगटातील व्यक्तींचे प्रमाण सातत्याने घटत आहे. २००१ मध्ये हे प्रमाण ८.४ टक्के होते. २०२६ पर्यंत ५.२ टक्क्यांवर येण्याचा अंदाज आहे. म्हणजेच भविष्यात कमी कमावत्या व्यक्तींवर अधिक ज्येष्ठांची जबाबदारी येणार आहे. पूर्वी संयुक्त कुटुंबे होती. आता कुटुंबांचा आकार लहान झाला आहे. रोजगारासाठी तरुण गाव सोडून शहरांकडे जात आहेत. त्याचवेळी लोकांचे आयुर्मान वाढले आहे. त्यामुळे घरातील ज्येष्ठांची देखभाल करणारे हात कमी पडत आहेत. आजही देशातील ९४ टक्के ज्येष्ठांची देखभाल घरातील सदस्यच करतात, असे या अहवालात म्हटले आहे. ग्रामपंचायत, आशासेविका, अंगणवाडी, स्वयंसाहाय्यता गट आणि आयुष्मान आरोग्य मंदिरे यांना एकत्र जोडून गावपातळीवरील सेवा व्यवस्था उभारण्याची शिफारस करण्यात आली आहे. नवीन इमारती उभारण्यापेक्षा सध्या उपलब्ध असलेल्या यंत्रणांचा प्रभावी वापर करण्यावर भर देण्यात आला आहे. देशातील सुमारे दोन तृतीयांश मृत्यू आता मधुमेह, हृदयविकार आणि कर्करोग यांसारख्या असंसर्गजन्य आजारांमुळे होत आहेत. त्यामुळे केवळ रुग्णालये वाढवून चालणार नाही. दीर्घकालीन आजारांनी त्रस्त असलेल्या आणि ज्येष्ठ नागरिकांना गावातच नियमित सेवा मिळणे आवश्यक असल्याचे अभ्यासात म्हटले आहे. रोजगाराची मोठी संधी अभ्यासानुसार, सेवा अर्थव्यवस्थेत देशाच्या सकल देशांतर्गत उत्पन्नाच्या २ टक्के गुंतवणूक केल्यास सुमारे १.१ कोटी रोजगार निर्माण होऊ शकतात. याचा सर्वाधिक फायदा ग्रामीण भागातील महिलांना होऊ शकेल. महिलांवर सर्वाधिक भार, रोजगारांच्या संधींवर परिणाम घरातील मुलांची, आजारी व्यक्तींची आणि ज्येष्ठांची देखभाल करण्याची सर्वाधिक जबाबदारी महिलाच निभावत आहेत. महिला दररोज सरासरी ३०५ मिनिटे विनामूल्य ही कामे करतात. पुरुष मात्र यासाठी केवळ ५६ मिनिटे देतात. त्यामुळे महिलांच्या रोजगाराच्या संधींवरही परिणाम होतो.





















