Health Issues in Pune-Mumbai: पुणे-मुंबईत महिलांमध्ये लठ्ठपणा आणि आरोग्याचे गंभीर प्रश्न

पुणे : महाराष्ट्रातील महिलांच्या आरोग्याच्या बाबतीत चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार, राज्यातील प्रत्येक तीन महिलांपैकी ए
पुणे : महाराष्ट्रातील महिलांच्या आरोग्याच्या बाबतीत चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार, राज्यातील प्रत्येक तीन महिलांपैकी एक महिला लठ्ठ किंवा जादा वजनाची आहे. याशिवाय, प्रत्येक चौथ्या महिलेला उच्च रक्तदाब आणि प्रत्येक सहाव्या महिलेला मधुमेहाचा त्रास आहे. विशेषतः पुणे आणि मुंबईसारख्या शहरी भागात या समस्यांचा प्रकोप अधिक प्रमाणात दिसून येत आहे. या सर्वेक्षणात शहरी आणि ग्रामीण भागातील महिलांचे आरोग्य याबाबत सखोल माहिती दिली गेली आहे. १५ ते ४९ वर्षे वयोगटातील ३१.१ टक्के महिलांना लठ्ठपणा आहे, तर कमी वजनाच्या महिलांचे प्रमाण १६.२ टक्क्यांवरून १७.१ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. यावरून स्पष्ट होते की, महाराष्ट्रात कुपोषण आणि लठ्ठपणा यांची एकत्रित समस्या आहे, जी चिंताजनक आहे.
मधुमेहाच्या बाबतीतही परिस्थिती गंभीर आहे. सर्वेक्षणानुसार, रक्तातील साखरेच्या प्रमाणामुळे किंवा मधुमेहाच्या औषधांचा वापर करणाऱ्या महिलांचे प्रमाण १६ टक्के आहे, तर पुरुषांचे प्रमाण १७.७ टक्के आहे. यामध्ये पुरुषांमध्ये मधुमेहाचे प्रमाण शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागात सरासरी पाच ते सात टक्क्यांनी वाढले आहे. उच्च रक्तदाबाच्या बाबतीतही पुरुषांमध्ये प्रमाण अधिक आहे; शहरी भागात महिलांचे प्रमाण २६ टक्के आहे, तर पुरुषांचे ३० टक्के आहे. ग्रामीण भागातही हे प्रमाण कमी नाही; महिलांचे २४.९ टक्के आणि पुरुषांचे २७.७ टक्के आहे. यामुळे स्पष्ट होते की, जीवनशैलीजन्य आजारांची वाढती समस्या राज्यासाठी एक गंभीर आव्हान बनली आहे.





















