Covid and Dormant Viruses: कोविड संपला तरी धोका कायम? शरीरातील सुप्त विषाणू पुन्हा सक्रीय होण्याचा डॉक्टरांचा इशारा

कोविड-19 च्या काळात शरीरात सुप्त अवस्थेत असलेल्या विषाणूंचा पुन्हा सक्रिय होण्याचा धोका वाढला आहे, असा इशारा एका नव्या संशोधनातून देण्यात आला आहे. अमेरिकेतील यु
कोविड-19 च्या काळात शरीरात सुप्त अवस्थेत असलेल्या विषाणूंचा पुन्हा सक्रिय होण्याचा धोका वाढला आहे, असा इशारा एका नव्या संशोधनातून देण्यात आला आहे. अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास, ऑस्टिनच्या संशोधकांनी कोविडच्या पहिल्या लाटेदरम्यान रुग्णालयात दाखल झालेल्या हजारो रुग्णांच्या नमुन्यांचा अभ्यास केला. या अभ्यासात आढळले की, अनेक रुग्णांच्या शरीरात वर्षानुवर्षे निष्क्रिय असलेले विषाणू पुन्हा सक्रिय झाले आहेत. यामुळे कोविडमुळे होणाऱ्या दीर्घकालीन परिणामांविषयी चिंतेचा इशारा देण्यात आला आहे. कोविडच्या काळात सक्रिय झालेल्या विषाणूंमध्ये हर्पिस कुटुंबातील एपस्टीन-बार विषाणू आणि सायटोमेगालोव्हायरस यांचा समावेश आहे. या विषाणूंचा प्रभाव विशेषतः नवजात बाळं आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींवर अधिक असतो. संशोधकांनी अॅनेलोव्हायरस या विषाणूंचा गट देखील पुन्हा सक्रिय होण्याचे पुरावे सापडले आहेत, जे मानवांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतात. तज्ज्ञांच्या मते, या विषाणूंचा प्रभाव कमी करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्तीवर ताण येतो, ज्यामुळे दीर्घकाळ सुप्त असलेले विषाणू पुन्हा सक्रिय होऊ शकतात.
संशोधनात असेही आढळले आहे की, सर्व सुप्त विषाणू एकाच वेळी सक्रिय होत नाहीत. कोविडच्या उपचारादरम्यान एपस्टीन-बार विषाणू आणि अॅनेलोव्हायरस सक्रिय झाले, तर सायटोमेगालोव्हायरस आणि हर्पिस सिम्प्लेक्स विषाणू साधारणतः तीन आठवड्यांनी सक्रिय झाले. या विषाणूंचा प्रभाव फुप्फुसांमध्ये आणि श्वसनमार्गात आढळतो. कोविडच्या संसर्गामुळे रोगप्रतिकारक शक्तीवर तात्पुरता ताण येतो, ज्यामुळे अनेक वर्षे सुप्त अवस्थेत असलेले विषाणू पुन्हा सक्रिय होऊ शकतात. यामुळे रुग्णाची प्रकृती अधिक गंभीर होण्याची शक्यता असते. संशोधकांनी एक वर्षभर रुग्णांचा पाठपुरावा केला, ज्यामध्ये अॅनेलोव्हायरस सक्रिय झालेल्या रुग्णांमध्ये कोविड दीर्घकाळासाठी सक्रिय राहण्याचे लक्षात आले. यामुळे थकवा, श्वास घेण्यास त्रास आणि लक्ष केंद्रित न होणे यासारखी लक्षणे अनेक महिने किंवा वर्षभर दिसू शकतात.



















