Beware of Adulterated Spices: मसाल्यातील भेसळाबद्दल सावधगिरी बाळगा

स्वयंपाकघरात वापरण्यात येणाऱ्या मसाल्यांची गुणवत्ता आणि शुद्धता याबद्दल आपण सहसा विचार करत नाही. जिरं, लवंग, धणे, मिरची, हळद यांसारखे मसाले थोड्या प्रमाणात वापर
स्वयंपाकघरात वापरण्यात येणाऱ्या मसाल्यांची गुणवत्ता आणि शुद्धता याबद्दल आपण सहसा विचार करत नाही. जिरं, लवंग, धणे, मिरची, हळद यांसारखे मसाले थोड्या प्रमाणात वापरले जातात, परंतु त्यांची शुद्धता अत्यंत महत्त्वाची आहे. दिल्ली पोलिसांनी केलेल्या एका कारवाईत बनावट मसाले तयार करणाऱ्या युनिटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त मसाले आणि त्यासाठी लागणारा कच्चा माल जप्त करण्यात आला आहे. दिल्लीच्या खारी बावली परिसरात २३ मे रोजी पोलिसांनी एका घरात छापा टाकला, जिथे बनावट मसाले तयार केले जात होते. या कारवाईत ८०१.८८ किलो भेसळयुक्त मसाले आणि कच्चा माल जप्त करण्यात आला. या प्रकरणात एक व्यक्ती अटक करण्यात आली असून, या मसाल्यांचा पुरवठा दिल्ली-एनसीआरच्या विविध भागांत करण्यात येत असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
पोलिसांच्या तपासात असे आढळले की, मसाल्यांचा नैसर्गिक दर्जा टिकवण्याऐवजी त्यांना आकर्षक बनवण्यासाठी आणि वजन वाढवण्यासाठी कमी दर्जाचे पदार्थ आणि कृत्रिम रंगांचा वापर केला जात आहे. हळद पावडर, लाल तिखट, पिवळी मिरची पावडर, धणे पावडर, आमचूर आणि गरम मसाला तयार करण्यासाठी तांदळाचे तुकडे, मिरचीचे देठ, धण्याचे देठ, कृत्रिम खाद्यरंग आणि इतर भेसळयुक्त कच्चा माल वापरण्यात येत आहे. जप्त केलेल्या काही कृत्रिम रंगांचा वापर खाद्यपदार्थांसाठी योग्य आहे का, याबाबत संशय व्यक्त करण्यात आला आहे आणि नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. ग्राहकांनी जिऱ्याबाबतही सावध राहणे आवश्यक आहे, कारण जिऱ्यामध्ये जिऱ्यासारखे दिसणारे गवताचे बी कोळशाच्या भुकटीने रंगवून मिसळले जाऊ शकते.



















