Scholarship Exam Final Result: चौथी, सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर… एकूण ३३ हजार २८१ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीधारक!

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे आयोजित केलेल्या इयत्ता चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत ए
पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे आयोजित केलेल्या इयत्ता चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत एकूण २७.०९ टक्के निकाल लागला असून, चौथी आणि सातवीच्या एकत्रित ३३ हजार २८१ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे. परीक्षा परिषदेतर्फे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी याबाबतची माहिती दिली. चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा २६ एप्रिल रोजी राज्यभर विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात आल्या. त्यानंतर २५ जुलै रोजी अंतरिम निकाल जाहीर करण्यात आला, ज्यामध्ये गुणपडताळणीसाठी अर्ज मागवण्यात आले होते. आलेले अर्ज निकाली काढून अंतिम निकाल तयार करण्यात आला. इयत्ता चौथी आणि सातवीच्या परीक्षेसाठी एकूण ११ लाख ५६ हजार ७४४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी १० लाख ९१ हजार २५२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. २ लाख ९५ हजार ५४६ विद्यार्थी पात्र ठरले, तर ३३ हजार २८१ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत.
इयत्ता चौथीच्या परीक्षेसाठी ६ लाख ९४ हजार ६०३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६ लाख ५७ हजार ३८२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामध्ये १ लाख ७६ हजार ५८६ विद्यार्थी पात्र ठरले, तर १६ हजार ६९३ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले. चौथीच्या परीक्षेचा एकूण निकाल २६.८७ टक्के लागला. दुसरीकडे, इयत्ता सातवीच्या परीक्षेसाठी ४ लाख ६२ हजार १४१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी ४ लाख ३३ हजार ८७० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. १ लाख १८ हजार ९६० विद्यार्थी पात्र ठरले, तर १६ हजार ५८८ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले. सातवीचा एकूण निकाल २७.४२ टक्के लागला आहे.
अंतिम निकालानुसार, शासनमान्य मंजूर शिष्यवृत्ती संचाच्या अधीन राहून, तसेच शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार, ज्या जिल्ह्यात किंवा तालुक्यात मंजूर संच संख्येच्या प्रमाणात विद्यार्थी उपलब्ध झाले नाहीत, अशा उर्वरित संच इतर जिल्हा किंवा तालुक्यात हस्तांतरित करून शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार करण्यात आली आहे. राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र यादी, प्रमाणपत्र संबंधित शाळांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्राची डिजिटल प्रत संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. शाळांनी उत्तम प्रतिच्या कागदावर रंगीत प्रत तयार करून विद्यार्थ्यांना वितरित करावी. तसेच, डिजिटल प्रत मागणीनुसार उपलब्ध करावी. परीक्षा परिषदेतर्फे नमूद करण्यात आले आहे की, गुणपत्रकाची डिजिटल प्रत उपलब्ध असल्याने छापील गुणपत्रक वितरित केले जाणार नाही.





















