Job Opportunities for Youth:तरुणांसाठी नोकऱ्यांच्या संधी कमी का?

डॉ. कुलदीपसिंह राजपूत, जो स्थलांतर आणि कामगार विषयांचे अभ्यासक आहेत, त्यांच्यानुसार जेन-झी ही भारतातील सर्वात डिजिटलदृष्ट्या सक्षम पिढी आहे. इंटरनेट, सोशल मीडिय
डॉ. कुलदीपसिंह राजपूत, जो स्थलांतर आणि कामगार विषयांचे अभ्यासक आहेत, त्यांच्यानुसार जेन-झी ही भारतातील सर्वात डिजिटलदृष्ट्या सक्षम पिढी आहे. इंटरनेट, सोशल मीडिया, ऑनलाइन शिक्षण आणि जागतिक घडामोडींची तत्काळ उपलब्धता यामुळे या पिढीची दृष्टी व्यापक झाली आहे. त्यांची अपेक्षा अधिक उंचावली आहे आणि पारंपरिक शिक्षणापलीकडे जाऊन कौशल्याधारित शिक्षण, स्टार्टअप संस्कृती आणि फ्रीलान्सिंगसारख्या नव्या संधींशी ही पिढी परिचित आहे. तथापि, या सर्व बदलांच्या पार्श्वभूमीवर एक मोठा विरोधाभास आहे. माहिती तंत्रज्ञान आणि संधींची उपलब्धता असतानाही लाखो जेन-झी रोजगाराच्या शोधात भटकत आहेत. हा प्रश्न केवळ बेरोजगारीचा नाही, तर भारतातील शिक्षणव्यवस्था, कौशल्ये, जेन-झीच्या आकांक्षा आणि रोजगार बाजारातील उपलब्ध संधी यांच्यातील विसंगतीचे प्रतीक आहे. भारताला 'युवकांचा देश' म्हणून गौरवले जाते, परंतु या लाभांशाचे वास्तव अधिक बारकाईने पाहण्याची गरज आहे. देशातील युवकांची संख्या सुमारे ३७ कोटी आहे, जी केवळ अभिमानाची बाब नसून, देशासमोरील मोठी जबाबदारी आहे. या तरुणांना योग्य शिक्षण देण्यात आणि त्यांच्या कौशल्यांना साजेसा, सन्मानजनक रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सक्षम व्यवस्था उभ्या करण्यात आपण कमी पडत आहोत. याचे गांभीर्याने आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. या विसंगतीचे परिणाम केवळ आर्थिक नाहीत, तर सामाजिक आणि मानसिकही आहेत. शिक्षण पूर्ण करूनही अपेक्षित रोजगार न मिळणे हे अनेक घरांतील वास्तव आहे. विकसित देशांमध्ये कार्यसंस्कृती, योग्य वेतन, कामगारांचे हक्क आणि सामाजिक सुरक्षा यांना विकासाच्या केंद्रस्थानी स्थान दिले जाते. भारतात मात्र या बाबींमध्ये अजूनही मोठी दरी आहे. परिणामी, अनेक जेन-झींच्या मनात व्यवस्थेविषयी निराशा, असुरक्षितता आणि भविष्याबद्दलचा संभ्रम वाढत आहे. लोकसंख्यात्मक लाभांश तेव्हाच विकासाचे इंजिन ठरतो, जेव्हा तरुणांचे शिक्षण, कौशल्ये आणि रोजगार यांच्यात परिणामकारक दुवा निर्माण होतो. दाश आणि पाधी यांच्या पिरॉडिक लेबर फोर्स सर्व्हेच्या विश्लेषणानुसार, जेन-झीमधील तरुण पुरुषांपैकी सुमारे १२ टक्के हंगामी किंवा असंघटित रोजगारात आहेत, तर केवळ १४.८ टक्के तरुणांना नियमित वेतनाची नोकरी मिळते. मुलींची स्थिती याहूनही गंभीर आहे, कारण सुमारे ३५ टक्के मुली घरगुती जबाबदाऱ्यांमध्ये गुंतल्यामुळे श्रमबाजारपेठेबाहेर आहेत. नियमित वेतनाची नोकरी करणाऱ्यांचे प्रमाण अवघे ४.७ टक्के आहे. इंडिया एम्प्लॉयमेंट रिपोर्ट २०२४ नुसार, देशातील एकूण बेरोजगारांपैकी ८३ टक्के बेरोजगार हे तरुण आहेत. सुशिक्षित तरुणांचे प्रमाण २००० मध्ये ३५ टक्क्यांवरून २०२२ मध्ये ६६ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. आकडेवारी भ्रामक असू शकते, परंतु आज अनेक सर्वसामान्य कुटुंबांमध्ये दिसणारे वास्तव, जेन-झीला झोंबणारी बेरोजगारीची झळ आणि पालकांच्या मनातील चिंता नाकारता येणार नाही. जेन-झी ही पूर्वीच्या पिढीपेक्षा अनेक बाबतींत वेगळी आहे. ही पिढी केवळ नोकरी शोधणारी नसून, पर्याय निवडणारी आहे. स्वतःची ओळख, भाषा आणि संस्कृती जपत, कामाच्या स्वरूपाबाबत स्पष्ट अपेक्षा बाळगणारी ही पिढी 'कोणतीही' नोकरी स्वीकारण्यास तयार नसते. पारंपरिक 'दहा ते पाच' कार्यालयीन नोकऱ्यांपेक्षा जेन-झीचा कल अधिक लवचीक, स्वायत्त, तंत्रज्ञानाधारित आणि स्वयंरोजगाराच्या संधींकडे आहे. भारतात आजच्या रोजगाराच्या संधी आणि जेन-झीच्या अपेक्षा यांच्यात लक्षणीय दरी आहे. जर जेन-झी गिग अर्थव्यवस्थेत प्रवेश करत असेल तर या गिग रोजगाराला सुरक्षित, सन्मानजनक आणि नियमनबद्ध रोजगार क्षेत्र म्हणून विकसित करण्यासाठी आपण पावलं उचलत आहोत का? भविष्यातील रोजगार धोरणाचे उद्दिष्ट केवळ रोजगारनिर्मितीपुरते मर्यादित नसावे. जेन-झी आणि पुढील जनरेशनच्या गरजा, अपेक्षा ध्यानात घेत सुसंगत व सुरक्षित रोजगार परिसंस्था उभारण्यातच भारताच्या लोकसंख्यात्मक लाभांशाचे खरे यश दडलेले आहे.



















