Medical Admission Process Begins:वैद्यकीय, दंत पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

मुंबई: राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेची घोषणा केल्यानंतर, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) राज्य कोट्याच्
मुंबई: राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेची घोषणा केल्यानंतर, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) राज्य कोट्याच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. विद्यार्थ्यांना वैद्यकीय आणि दंत अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी १२ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची संधी मिळेल. पहिली गुणवत्ता यादी २३ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. शासकीय, अनुदानित, महानगरपालिका आणि खासगी महाविद्यालयांमधील राज्य कोट्यातील प्रवेश नीट (यूजी) २०२६ च्या गुणवत्तेनुसार दिला जातो. राज्य कोट्यात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय कोट्यासाठी नोंदणी केली असली तरी त्यांना स्वतंत्रपणे सीईटी कक्षाकडे अर्ज नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांना १२ ऑगस्ट रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज नोंदणी करण्याची अंतिम मुदत आहे. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांचे रंगीत स्कॅन प्रत १३ ऑगस्टपर्यंत अपलोड करणे आवश्यक आहे. अपलोड केलेले कागदपत्रे ७ ते १४ ऑगस्ट दरम्यान ऑनलाइन किंवा छाननी केंद्राद्वारे पडताळले जातील. १५ ऑगस्ट रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. या यादीवर विद्यार्थ्यांना आक्षेप व हरकती नोंदविण्याची संधी १६ व १७ ऑगस्ट या कालावधीत मिळेल. जागांचा तपशील व अंतिम गुणवत्ता यादी १८ ऑगस्टला प्रसिद्ध केली जाईल. विद्यार्थ्यांना १९ ते २२ ऑगस्ट दरम्यान ऑनलाइन पसंतीक्रम नोंदविण्यासाठी मुदत दिली जाणार आहे. पहिली फेरी २३ ऑगस्ट रोजी जाहीर होईल. या फेरीमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी २४ ते २८ ऑगस्ट दरम्यान संबंधित महाविद्यालयात मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहून प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. प्रवेश प्रक्रियेच्या सर्व अद्ययावत माहिती अधिकृत संकेतस्थळ http://www.mahacet.org वर उपलब्ध आहे. आरक्षण प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र आणि नॉन क्रीमी लेयर प्रमाणपत्र तयार ठेवावे लागेल. इडब्ल्यूएस प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी वैध असलेले इडब्ल्यूएस प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. अपंग विद्यार्थ्यांनी वैद्यकीय मंडळाने जारी केलेले अपंग पात्रता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. ओबीसी व एसईबीसी विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी झाल्यापासून सहा महिन्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे. मात्र, निर्धारित कालावधीत प्रमाणपत्र सादर न केल्यास प्रवेश रद्द होऊ शकतो. एनआरआय विद्यार्थ्यांनी त्यांच्या पात्रतेच्या पडताळणीसाठी ११ ऑगस्टपूर्वी विदेशी उमेदवार नोंदणी पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. एनआरआय विद्यार्थी गुणवत्तेनुसार केवळ १५ टक्के संस्थात्मक कोट्यासाठी पात्र आहेत. कागदपत्रांची रंगीत स्कॅन प्रत अपलोड करण्याची आणि शुल्क भरण्याची प्रक्रिया ६ ते १२ ऑगस्ट दरम्यान सुरू राहील. महाविद्यालयात प्रवेश निश्चिती २४ ते २८ ऑगस्ट दरम्यान होईल.



















