Crime News:अडीच वर्षांत ९८० बळी; तरी अपघातांना ‘ब्रेक’ नाही..!

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत गेल्या अडीच वर्षांत म्हणजेच २०२४ ते जुलै २०२६ या कालावधीत ९३५ प्राणांतिक अपघातांमध्ये एकूण ९८० जणांचा मृत्यू झाला आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत गेल्या अडीच वर्षांत म्हणजेच २०२४ ते जुलै २०२६ या कालावधीत ९३५ प्राणांतिक अपघातांमध्ये एकूण ९८० जणांचा मृत्यू झाला आहे. याचा अर्थ दररोज सरासरी एकाहून अधिक नागरिकांना रस्त्यावर जीव गमवावा लागतो. राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर असलेल्या 'ब्लॅक स्पॉट', भरधाव वेग, वाहतूक नियमांचे उल्लंघन, अवजड वाहनांची बेफिकीर वाहतूक आणि रस्त्यांची दुरवस्था यामुळे अपघातांचे प्रमाण चिंताजनकपणे वाढत आहे. पिंपरी-चिंचवड हद्दीतील महामार्ग हे सर्वाधिक धोकादायक ठरत आहेत. औद्योगिक क्षेत्र, आयटी कंपन्या आणि वाहतूक यांचा प्रचंड प्रवाह यामुळे अपघातांची संख्या वाढत असल्याचे वाहतूक शाखेच्या निरीक्षणात स्पष्ट झाले आहे.
या मार्गांवर अपघातप्रवण ठिकाणे म्हणजेच 'ब्लॅक स्पॉट' आहेत. काही ठिकाणी तीव्र वळणे, अपुरी प्रकाशयोजना, रस्त्यांवरील खड्डे, चुकीचे कट, सेवारस्त्यांचा अभाव आणि अचानक रस्ता ओलांडणारे पादचारी यामुळे अपघातांना निमंत्रण मिळते. यामध्ये वेगमर्यादेचे उल्लंघन, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे, हेल्मेट व सीटबेल्टचा वापर न करणे, मोबाइलवर बोलत वाहन चालवणे आणि चुकीच्या दिशेने वाहन चालविणे यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीतील रस्त्यांची दुरवस्था मोठ्या प्रमाणात झाली आहे. पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे झाल्यामुळे वाहनाचा वेग मंदावतो आणि वाहतुकीचा खोळंबा होतो, ज्यामुळे अपघातांची शक्यता वाढते.





















