Sharp Object Found in Meal: जेवणाच्या घासात चक्क ब्लेड; कुटुंबाच्या ताटात टोकदार वस्तू आढळल्याने खळबळ

नागपूर शहरातील एका रेस्टॉरंटमध्ये जेवण करताना कुटुंबातील एका महिलेच्या तोंडात अचानक एक टोकदार वस्तू सापडल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित कुटुंबाने दावा केला आहे क
नागपूर शहरातील एका रेस्टॉरंटमध्ये जेवण करताना कुटुंबातील एका महिलेच्या तोंडात अचानक एक टोकदार वस्तू सापडल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित कुटुंबाने दावा केला आहे की, जेवणातून बाहेर काढल्यानंतर ती वस्तू एक ब्लेड असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेमुळे अन्नपदार्थांच्या स्वच्छतेचा आणि सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी बजाजनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्रतापनगर परिसरातील या रेस्टॉरंटमध्ये कुटुंब जेवणासाठी गेले होते, तेव्हा अचानक या घटनेने त्यांना धक्का बसला. महिलेने ती वस्तू तोंडातून बाहेर काढल्यानंतर ती ब्लेड असल्याचे लक्षात आले, ज्यामुळे कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. या घटनेनंतर कुटुंबाने तात्काळ बजाजनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली, परंतु अन्न व औषध प्रशासनाकडे अद्याप या प्रकरणाबाबत कोणतीही अधिकृत तक्रार प्राप्त झालेली नाही, असे विभागाने स्पष्ट केले आहे. संबंधित रेस्टॉरंटचे नाव उत्तर-दक्षिण नैवेद्यम रेस्टॉरंट असल्याचे समजले आहे.
अन्न व औषध प्रशासनाने नागपूर शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि खाद्य आस्थापनांमध्ये स्वच्छतेच्या अभावाबाबत गेल्या २४ दिवसांत १२१ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यापैकी ४७ प्रकरणांची चौकशी पूर्ण झाली असून २७ प्रकरणे अद्याप तपासाधीन आहेत. चौकशीदरम्यान काही आस्थापनांमध्ये अस्वच्छता, दुर्गंधीचे वातावरण, अन्न तयार करताना स्वच्छतेच्या नियमांचे पालन न करणे आणि निकृष्ट सामग्रीचा वापर होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. चौकशी पूर्ण झालेल्या प्रकरणांमध्ये संबंधित आस्थापनांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली असून दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या तक्रारींमध्ये रेस्टॉरंट्ससह सरकारी आणि खासगी वसतिगृहांच्या मेसचा समावेश आहे.





















