New 'Death Drug' in India: भारताच्या दारात 'डेथ ड्रग'ची चाहूल

भारताच्या सीमेजवळ आता एक नवीन 'डेथ ड्रग' म्हणजेच निटाझिन्सचा उदय झाला आहे. हेरॉइनपेक्षा ५०० पट अधिक शक्तिशाली मानला जाणारा हा कृत्रिम अमली पदार्थ जगभरात अनेक मृ
भारताच्या सीमेजवळ आता एक नवीन 'डेथ ड्रग' म्हणजेच निटाझिन्सचा उदय झाला आहे. हेरॉइनपेक्षा ५०० पट अधिक शक्तिशाली मानला जाणारा हा कृत्रिम अमली पदार्थ जगभरात अनेक मृत्यूंचा कारण बनला आहे. काही मिलिग्रॅम चा वापर केल्यास तो क्षणात जीव घेऊ शकतो. त्यामुळे भारतासाठी हा एक गंभीर आणि नवीन धोका ठरला आहे. पारंपारिक अमली पदार्थ जसे की अफू, हेरॉइन आणि कोकेन यांच्याबरोबर आता निटाझिन्सचा समावेश झाला आहे, जो प्रयोगशाळेत तयार होणारा एक अत्यंत धोकादायक पदार्थ आहे. यामुळे भारतात या पदार्थाच्या वाढत्या वापरामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने आपल्या २०२५ च्या वार्षिक अहवालात याबाबत गंभीर इशारा दिला आहे. निटाझिन्स हा ओपिओइड गटातील पदार्थ आहे, जो १९५० च्या दशकात वेदना कमी करण्यासाठी विकसित करण्यात आला होता, परंतु त्याची शक्ती इतकी अधिक आहे की वैद्यकीय वापरासाठी त्याला कधीच मान्यता मिळाली नाही. आज हा पदार्थ बेकायदेशीरपणे तयार केला जातो आणि गुप्त संकेतस्थळांवर विकला जातो. तो पावडर, गोळ्या आणि द्रवरूपात उपलब्ध आहे, आणि अनेकदा हेरॉइन किंवा कोकेनमध्ये मिसळला जातो, त्यामुळे वापरकर्त्याला त्याच्या सेवनाची कल्पनाही नसते. अंमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या अहवालानुसार, इटोनिटाझिन हे निटाझिन्समधील एक रसायन हेरॉइनपेक्षा ५०० पट अधिक प्रभावी आहे. अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर मृत्यूंचा कारण ठरलेल्या फेन्टॅनीलपेक्षा काही निटाझिन्स अधिक घातक मानले जातात. या पदार्थाची काही मिलिग्रॅम मात्रा देखील जीव घेऊ शकते, ज्यामुळे श्वसनक्रिया थांबू शकते. यामुळे जगभरात निटाझिन्सला 'डेथ ड्रग' म्हणून ओळखले जात आहे. अंमली पदार्थांच्या बदलत्या जगात निटाझिन्स हे एक गंभीर आव्हान आहे, त्यामुळे यावर लक्ष ठेवणे आणि त्याचा प्रसार रोखणे आवश्यक आहे.
अंमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या माहितीनुसार, भारतात निटाझिन्सचा वापर सध्या तस्करीसाठी अधिक होत आहे. या पदार्थाच्या निर्मितीसाठी लागणारी काही रसायने भारतातून इतर देशांत पाठवली जात असल्याचे तपासात समोर आले आहे. एनसीबीच्या अहवालानुसार, निटाझिन्सचा शिरकाव आता मलेशिया आणि सिंगापूरसारख्या आशियाई देशांमध्ये झाला आहे. त्यामुळे भारतात या पदार्थाचा प्रवेश होण्याची शक्यता अधिक वाढली आहे. तस्कर आता डार्क वेब आणि कुरिअर सेवांचा वापर करून या अमली पदार्थांचा व्यापार करत आहेत. भारत आणि चीनमधून ऑर्डर घेऊन अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटनसारख्या देशांत हे अमली पदार्थ पाठवले जात असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय तपासातून समोर आली आहे. आफ्रिकेतील 'कुश' या अमली पदार्थात निटाझिन्सची भेसळ करून विक्री झाल्याने मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाल्याची उदाहरणेही समोर आली आहेत. निटाझिन्सचे सर्वात भयावह वैशिष्ट्य म्हणजे त्याची भेसळ. अनेकदा तो इतर अमली पदार्थांमध्ये मिसळून विकला जातो, त्यामुळे सेवन करणाऱ्या व्यक्तीला प्रत्यक्षात अत्यंत घातक पदार्थ शरीरात जात आहे, याची कल्पनाच नसते. परिणामी, अपेक्षेपेक्षा अनेक पटींनी तीव्र परिणाम होऊन काही मिनिटांतच ओव्हरडोज होऊ शकतो. हीच बाब या पदार्थाला इतर सर्व सिंथेटिक ड्रग्जपेक्षा अधिक धोकादायक बनवते.





















