Analysis:म्युल अकाउंट : सायबर फसवणुकीतील अदृश्य दुवा की नकळत ओढवलेला गुन्हा?

सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे 'म्युल अकाउंट' हा शब्द आता केवळ तपास यंत्रणांपुरता मर्यादित राहिलेला नाही. डिजिटल अटक, बनावट गुंतवणूक, ऑनलाइन कर्ज, ओटीपी फस
सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे 'म्युल अकाउंट' हा शब्द आता केवळ तपास यंत्रणांपुरता मर्यादित राहिलेला नाही. डिजिटल अटक, बनावट गुंतवणूक, ऑनलाइन कर्ज, ओटीपी फसवणूक, सोशल मीडिया फसवणूक अशा विविध गुन्ह्यांमधून लुटलेला पैसा काही मिनिटांत अनेक बँक खात्यांतून फिरवला जातो. या संपूर्ण आर्थिक साखळीतील सर्वात महत्त्वाचा दुवा म्हणजे म्युल अकाउंट. अनेकदा खातेदाराला आपण सायबर गुन्हेगारांच्या जाळ्याचा भाग झालो आहोत, याची कल्पनाही नसते. त्यामुळे म्युल अकाउंट म्हणजे नेमके काय, त्याचा वापर कसा होतो, त्यामागील यंत्रणा काय आहे आणि त्यापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, याबाबत जनजागृती आवश्यक ठरते.
म्युल अकाउंट म्हणजे बेकायदेशीररित्या मिळालेला पैसा एका खात्यातून दुसऱ्या खात्यात वळवण्यासाठी वापरले जाणारे बँक खाते. सायबर गुन्हेगार स्वतःच्या खात्यात रक्कम स्वीकारण्याऐवजी इतर व्यक्तींच्या खात्यांचा वापर करतात. त्यामुळे पैशांचा मूळ स्रोत आणि अंतिम लाभार्थी यांचा माग काढणे तपास यंत्रणांसाठी अधिक कठीण होते. काही जण कमिशनच्या मोबदल्यात जाणीवपूर्वक आपले खाते उपलब्ध करून देतात; तर काहींना 'घरबसल्या कमवा', 'पार्ट-टाईम जॉब', 'फक्त पैसे स्वीकारून पुढे पाठवा' किंवा 'बँकिंग एजंट' अशा आमिषांनी जाळ्यात ओढले जाते. विद्यार्थी, बेरोजगार युवक, गृहिणी, ज्येष्ठ नागरिक आणि आर्थिक अडचणीत असलेल्या व्यक्ती हे अशा फसवणुकीचे सोपे लक्ष्य ठरत आहेत. अनेकदा खाते उघडताना किंवा वापरताना आपण कायदेशीर जबाबदारी स्वीकारत आहोत, याची जाणीव नसल्यामुळे ते नकळत सायबर गुन्हेगारीच्या साखळीतील महत्त्वाचा दुवा बनतात.





















