Sugar Industry Issues: साखर कारखान्यांनी सादर केलेली एफआरपीची आकडेवारी आणि प्रत्यक्ष स्थिती यामध्ये तफावत

राज्यातील साखर कारखान्यांनी साखर आयुक्त कार्यालयाला थकीत एफआरपीची चुकीची आकडेवारी सादर केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी य
राज्यातील साखर कारखान्यांनी साखर आयुक्त कार्यालयाला थकीत एफआरपीची चुकीची आकडेवारी सादर केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांच्याशी चर्चा करून या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. बैठकीत उपस्थित असलेल्या ॲड. योगेश पांडे आणि प्रभाकर बांगर यांच्यासमवेत शेट्टी यांनी कारखान्यांच्या आकडेवारीतील तफावत स्पष्ट केली. कारखानदारांनी दिलेल्या आकडेवारीमध्ये खूप मोठा फरक असल्याने आयुक्त कार्यालयाने यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी थकीत ऊसबिलासह योग्य उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. शेट्टी यांनी राज्य सरकारच्या दोन किंवा तीन टप्प्यांतील एफआरपीच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसानीबद्दलही चिंता व्यक्त केली. त्यांनी याबाबत संबंधित कारखान्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर विलंबाच्या कालावधीचे व्याज जमा करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीत शेतकऱ्यांच्या ऊसाच्या वजनात होणाऱ्या गैरप्रकारांवर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांच्या नावे दाखवले जाणारे ऊसाचे वजन आणि उतारा यामध्ये होणारी चोरी चिंतेचा विषय बनला आहे. यावर उपाययोजना म्हणून सर्व वजनकाटे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून ऑनलाइन जोडण्याची मागणी करण्यात आली आहे, ज्यामुळे काटामारी थांबवता येईल. याशिवाय, मराठवाड्यातील साखर कारखान्यांमध्ये रिकव्हरी चोरीचे प्रमाण वाढले आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी साखर आयुक्त कार्यालयाने स्वतंत्र तपासणी यंत्रणा स्थापन करावी, अशी मागणी शेट्टी यांनी केली. साखरेच्या बाजारातील वाढत्या दरामुळे कारखान्यांचा नफा वाढला आहे, त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांना प्रतिटन ३०० रुपयांचा दुसरा हप्ता तातडीने द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.





















