Success in Embryo Transfer: पुण्यात चार उच्च अनुवंशिक मुऱ्हा रेडकांचा जन्म

पुणे शहरातील ताथवडे येथील शासकीय पशुपैदास प्रक्षेत्रात अत्याधुनिक भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा वापर करून मुऱ्हा जातीच्या चार निरोगी रेडकांचा (तीन मादी व एक न
पुणे शहरातील ताथवडे येथील शासकीय पशुपैदास प्रक्षेत्रात अत्याधुनिक भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा वापर करून मुऱ्हा जातीच्या चार निरोगी रेडकांचा (तीन मादी व एक नर) यशस्वी जन्म झाला आहे. या घटनेला राज्यातील म्हैस संवर्धन व उच्च आनुवंशिक क्षमतेचे पशुधन निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. उच्च आनुवंशिक क्षमतेच्या म्हशींची जलद निर्मिती, उत्कृष्ट दुग्ध उत्पादन क्षमता असलेल्या पशुधनाचा प्रसार आणि राज्यातील दुग्ध व्यवसाय अधिक सक्षम करण्यासाठी भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा हा प्रयोग एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.
या उपक्रमासाठी वाकड येथील स्वप्नील कलाटे यांच्या उच्च क्षमतेच्या दुग्ध उत्पादक मुऱ्हा म्हशीचा दाता म्हणून वापर करण्यात आला. एका स्त्रीबीज संकलन सत्रात १७ अंडपेशी संकलित करण्यात आल्या. त्यापैकी पाच उच्च दर्जाचे भ्रूण विकसित करण्यात आले आणि ते दाई म्हशींमध्ये प्रत्यारोपित करण्यात आले. यामध्ये चार म्हशींमध्ये यशस्वी गर्भधारणा झाली असून त्यातून तीन मादी व एक नर अशा चार निरोगी मुऱ्हा रेडकांचा जन्म झाला.
राज्यात या तंत्रज्ञानाचा अधिक व्यापक विस्तार करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाच्या माध्यमातून राज्यातील सर्व शासकीय पशुपैदास प्रक्षेत्रांमध्ये उच्च वंशावळीचे सर्व जातींचे वळू निर्माण करण्यासाठी भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतलकुमार मुकणे यांनी दिली. राज्यात वाढत्या दर्जेदार म्हशीच्या दुधाच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी उच्च आनुवंशिक क्षमतेच्या म्हशींची निर्मिती आवश्यक आहे. भ्रूण प्रत्यारोपणासारखे आधुनिक प्रजनन तंत्रज्ञान भविष्यातील दुग्ध व्यवसायासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे, असे मत पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी व्यक्त केले.





















