Tribute to a Martyr: शहीद हरिदास कापसे अनंतात विलीन, शासकीय इतमामात अंतिमसंस्कार

बुलढाणा : उत्तराखंडमध्ये देशाच्या सेवेत वीरगती प्राप्त केलेले चिखलीचे सुपुत्र हवालदार हरिदास मधुकर कापसे (वय ३६) यांच्यावर आज सोमवारी चिखली येथील तालुका क्रीडा
बुलढाणा : उत्तराखंडमध्ये देशाच्या सेवेत वीरगती प्राप्त केलेले चिखलीचे सुपुत्र हवालदार हरिदास मधुकर कापसे (वय ३६) यांच्यावर आज सोमवारी चिखली येथील तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. भारतीय सैन्य दलातील ४२१ पॅरा फिल्ड कंपनीमध्ये कार्यरत असलेल्या या वीर जवानाने कर्तव्य बजावताना प्राणांची आहुती दिली. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी चिखली शहरासह तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. ‘शहीद जवान अमर रहे… भारत माता की जय…’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. भावुक वातावरणात हरिदास कापसे पंचतत्त्वात विलीन झाले. त्यांच्या पार्थिवाला चिखलीत दाखल झाल्यानंतर दांडगे ले आऊट येथील त्यांच्या निवासस्थानापासून अंतिम यात्रेला सुरुवात करण्यात आली. या अंतिम यात्रेत अनेक नागरिकांनी सहभाग घेतला, ज्यामुळे चिखलीच्या रस्त्यांवर एकत्रितपणे देशभक्तीचा उत्सव साजरा झाला.
अंतिम यात्रा सिद्ध सायन्स चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, आणि बसस्थानक मार्गे तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर पोहोचली. या मार्गावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. आपल्या शहरातील सुपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी आबालवृद्ध रस्त्याच्या दुतर्फा उभे होते. अंतिम यात्रेदरम्यान ‘शहीद जवान हरिदास कापसे अमर रहे।’, ‘भारत माता की जय।’ अशा घोषणांनी चिखलीचा आसमंत निनादून गेला. देशासाठी कर्तव्य बजावताना प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानाला निरोप देताना उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू होते. प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. हजारो नागरिकांनी वीर जवानाचे अंतिम दर्शन घेत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.





















